
भाईंदरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांची दुबार नावे असल्याची पोलखोल काँग्रेसने केली आहे. भाजपचे नगरसेवक, प्रमुख पदाधिकारी यांची मीरा-भाईंदरबरोबर त्यांच्या मूळ गावीदेखील मतदार याद्यांमध्ये नावे असल्याचा आरोप काँग्रेस प्रवक्ता दीपक बागरी यांनी केला आहे. आपल्या राज्यात निवडणूक लागली की ‘मेरा गांव मेरा सगा’ म्हणत गावी जाऊन मतदान करून यायचे आणि मीरा-भाईंदरमध्ये राहून राजकारण करीत निवडणूक लढवायची हा धंदा भाजपवाल्यांनी सुरू केला असल्याची टीकादेखील बागरी यांनी केली आहे.
भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक मदन सिंह व त्यांची पत्नी रिटा यांचे नाव उत्तर प्रदेशच्या जाफराबाद विधानसभा क्षेत्रातील यादीमध्ये नावे आहेत. तर प्रदेश प्रवक्ता शैलेश लालजी पांडे यांचेही उत्तर प्रदेशच्या त्याच मतदार संघात नाव असल्याचे सामंत यांनी सांगितले.
निवृत्त पोलिसाच्या पत्नीची दोन मतदार ओळखपत्रे
पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीची एकाच दिवशी दोन मतदार ओळखपत्रे पोस्टाने घरी आली आहेत. विशेष म्हणजे दोन्ही ओळखपत्रांवरील नाव, पत्ता, मतदार ओळख क्रमांक सर्व माहिती सारखी आहे. फोटो आणि कार्ड क्रमांक याच्यामध्ये फरक आहे. या प्रकारामुळे निवडणूक आयोगाचा बेफिकीर कारभार चव्हाट्यावर आला आहे.
डोंबिवलीतील कुंभारकान पाडा येथे राहणारे पोलीस अधिकारी अशोक कुलकर्णी यांच्या पत्नीच्या नावावर पोस्टाने दोन मतदार ओळखपत्रे आली. त्यांनी तत्काळ याची माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहर शाखेत जाऊन शहरप्रमुख प्रकाश तेलगोटे यांना दिली. या वेळी विभागप्रमुख राजेंद्र सावंत आणि संजय पाटील उपस्थित होते.




























































