
हिंद महासागरात थायलंड आणि मलेशियाच्या सीमेजवळ सुमारे 300 स्थलांतरितांना घेऊन जाणारी बोट बुडाली. त्यात 7 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता आहेत. या बोटीमध्ये म्यानमारमधील स्थलांतरित रोहिंग्या मुस्लिम होते.
मलेशियन मेरिटाईम एन्फोरसमेन्ट एजन्सीचे फर्स्ट अॅडमिरल रोमली मुस्ताफा यांनी अपघातासंदर्भात सांगितले की, ही बोट म्यानमारच्या बुथीडाऊंग या शहरातून निघाली होती. मलेशियाजवळ पोहोचल्यानंतर स्थलांतरितांना 3 लहान बोटींमध्ये विभागण्यात येणार होते. मात्र, त्यापूर्वीच दक्षिण थायलंडच्या तरुताओ या बेटाजवळ बोट बुडाली. सीमापर टोळ्या स्थलांतरितांचे शोषण करत असून अशा टोळ्या अधिक सक्रिय होत असल्याचे मुस्तफा म्हणाले. इतर दोन बोटींबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. सुमारे 583 चौ.कि.मी. एवढ्या सागरी परिसरात बेपत्ता बोटींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती मुस्तफा यांनी दिली.
मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
बोट नेमकी कुठे बुडाली याची माहिती बचाव पथकांना लवकर मिळाली नाही. बचाव पथक घटनास्थळी पोहोचल्यानंतर 13 जणांना वाचविण्यात यश आले, तर 7 जणांचे मृतदेह सापडले. बचावकार्य सुरूच असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.




























































