सनी फुलमाळीचे ‘सोनेरी’ यश

पालावरचं जिणं म्हणजे हालअपेष्टांची संघर्षकथा असली तरी त्यांचं हे जिणं म्हणजे मानवी जिद्दीचं, निसर्गाशी एकरूप झालेल्या जीवनाचं आणि संस्कृतीच्या अखंड प्रवासाचं प्रतीक असतं. अशा खडतर प्रवासात याच पालावरच्या घरात सनी फुलमाळी नावाच्या ‘सोनेरी’ मल्लाचा जन्म झाला. दुर्दम्य इच्छाशक्तीला कर्तृत्वाची जोड देत सनीने फुलमाळी घराण्याचा दोन पिढय़ांचा कुस्तीचा वारसा नुसताच जपला नाही, तर हिंदुस्थानचा तिरंगा सातासमुद्रापार फडकाविला. नुकत्याच बहरीन येथे झालेल्या आशियाई युवा (17 वर्षांखालील) कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत सनी फुलमाळीने 60 किलो गटात सुवर्णपदक जिंकून वडील सुभाष फुलमाळी यांनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवलं. एखाद्या सुपरहिट चित्रपटाच्या कथानकाला शोभावी अशा सनीच्या प्रेरणादायी कहाणीचा ‘सामना’ने आढावा घेतेला.

त्याचं कुटुंब मराठवाडय़ातील बीड जिह्यातून मजल-दरमजल करत 15 वर्षांपूर्वी पुण्यातील लोहगावमधील माळरानावर पालाच्या घरात स्थिरावलं.