भुयारी मेट्रो स्थानकांची सुरक्षा रामभरोसे, प्रवासी संख्या वाढली, मात्र जवानांचे मनुष्यबळ तोकडेच

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानक परिसरात सोमवारी झालेल्या भीषण स्पह्टानंतर मुंबईतील मेट्रो स्थानकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भुयारी मेट्रो मार्गिकेवरील स्थानकांची सुरक्षा रामभरोसे आहे. संपूर्ण मार्गिका प्रवासी सेवेसाठी खुली झाल्यानंतर लाखो प्रवाशांची वर्दळ सुरू झाली. त्या तुलनेत जवानांचे मनुष्यबळ तोकडेच आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट यांसारख्या वर्दळीच्या स्थानकांच्या सुरक्षेबाबतही मेट्रो प्रशासन गंभीर नसल्याचे स्पष्ट होत आहे.

आरे जेव्हीएलआर ते कफ परेडदरम्यान भुयारी मेट्रोची एकूण 27 स्थानके आहेत. सुरुवातीचे दोन टप्पे यापूर्वी प्रवासी सेवेसाठी खुले होते. त्यानंतर गेल्या महिन्यात वरळी सायन्स म्युझिअम ते कफ परेड हा अंतिम टप्पा प्रवासी सेवेत दाखल करण्यात आला. या मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, विधानभवन, चर्चगेट यांसारखी प्रमुख स्थानके असल्याने दररोज लाखो प्रवासी या मार्गिकेवरून प्रवास करू लागले आहेत. संपूर्ण मार्गिका खुली होऊन महिना उलटल्यानंतरही मेट्रो प्रशासनाला या मार्गिकेच्या सुरक्षेबाबत गांभीर्य नसल्याचे स्पष्ट होत आहे. चर्चगेट मेट्रो स्थानक हे पश्चिम रेल्वे मार्गिकेच्या मुख्य स्थानकाजवळ आहे. तसेच मेट्रोच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात मध्य रेल्वेच्या प्रवाशांची ये-जा सुरू असते. ही दोन्ही स्थानके अत्यंत संवेदनशील असताना मेट्रो प्रशासनाने तेथे पुरेशा प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली नाही. सद्यस्थितीत केवळ महाराष्ट्र सुरक्षा बलाचे मोजकेच जवान आणि कमी संख्येतील कर्मचारी असलेले श्वान पथक यांच्यावर मेट्रो स्थानकांच्या सुरक्षेची जबाबदारी सोपवलेली आहे. अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेचा फायदा दहशतवाद्यांकडून घेतला जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त केला जात आहे.   

चर्चगेट स्थानकाला आमदारांच्या गाडय़ांचा वेढा

चर्चगेट मेट्रो स्थानक हे मंत्रालय, विधान भवनाच्या काही अंतरावर आहे. मंत्रालय, विधान भवनात येणाऱ्या आमदारांच्या गाडय़ा चर्चगेट मेट्रो स्थानकाच्या प्रवेशद्वाराच्या आसपासच पार्क केल्या जात आहेत. त्या गाडय़ांचा मेट्रो प्रवाशांना अडथळा ठरत आहे.

चर्चगेट स्थानकात महाराष्ट्र सुरक्षा बलाचे केवळ पाच जवान तैनात होते. स्थानकात एण्ट्री करणाऱ्या प्रवाशांची तपासणी करण्याबरोबरच एकूण सहा प्रवेशद्वारावर पहारा ठेवण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानकातही तीच स्थिती दिसली.