
स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर राज्य सरकारच्यावतीने रत्नागिरीतील संगमेश्वरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील संकल्पचित्राचे आज सादरीकरण करण्यात आले. संगमेश्वरमध्ये पाच एकर जागेवर संभाजी महाराजांचे स्मारक उभारण्यात येणार असून पार्किंग आणि अन्य सुविधांसाठी अतिरिक्त दोन एकर जागा शासनाने घेतली आहे. स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर स्मारक उभारावे, अशी सूचना करण्यात आली होती. ही संकल्पना समजून घेण्यासाठी सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांच्या दालनात आज बैठक घेण्यात आली. या बैठकीला सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्व विभाग, रत्नागिरी जिल्हाधिकारी, तहसीलदार, सार्वजनिक बांधकाम विभाग व संबंधित अधिकारी उपस्थित होते.




























































