
कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटलमधील 200 कंत्राटी कामगार समान वेतन मिळावे यासाठी गेली 24 वर्षे लढा देत आहेत. याची गंभीर दखल उच्च न्यायालयाने घेतली आहे. कंत्राटी कामगारांना कायम सेवा कर्मचाऱयांप्रमाणे समान वेतन का दिले जात नाही याचा खुलासा ठाणे पालिका आयुक्तांनी करावा, अशी नोटीसच न्यायालयाने धाडली आहे. यावरील पुढील सुनावणी 18 नोव्हेंबरला होणार आहे.
ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील रुग्णालयातील कंत्राटी कर्मचारी समान वेतनासाठी लढा देत आहेत. हे सर्व कर्मचारी चतुर्थ श्रेणीतील असून त्यांनी आपल्याला न्याय मिळावा यासाठी अॅड. नीता कर्णिक यांच्यामार्फत याचिका केली आहे. न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. आरती साठे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.
या कर्मचाऱयांना सेवेत कायम करून घेणे किंवा पदे निर्माण करण्याबाबत ठाणे महापालिका व राज्य शासन एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. ठोस असा निर्णय घेतला जात नाही. राज्यघटनेने या कर्मचाऱयांचे अधिकार अबाधित ठेवले आहेत. कंत्राटी कर्मचाऱयांना कायम कर्मचाऱयांप्रमाणे वेतन मिळायला हवे, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे या कर्मचाऱयांना या लाभापासून वंचित ठेवता येणार नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
नगर विकासला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश
नगर विकास खात्याच्या सचिवांनीदेखील या कर्मचाऱयांच्या मुद्दय़ावर आपली भूमिका स्पष्ट करावी. याप्रकरणी न्यायालयाने जारी केलेल्या न्यायालयाच्या अवमानतेच्या नोटीसचे उत्तर द्यावे, असे निर्देश खंडपीठाने दिले.



























































