
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात गेल्या सात महिन्यांत तब्बल 14 लाख मतदार वाढले आहेत. त्याच वेळी जुन्या यादीतील 4 लाख नावे वगळण्यात आली आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने 1 जुलै 2025 पर्यंतची अद्ययावत मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. या नव्या यादीनुसार राज्यातील एकूण मतदारांची संख्या 9 कोटी 84 लाख 96 हजार 626 इतकी झाली आहे. ठाणे जिह्यात सर्वाधिक 2 लाख 25 हजार, तर मुंबई शहर आणि उपनगरात 1 लाख 14 हजार नव्या मतदारांची नोंद झाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत 1 जुलैपर्यंतची अद्ययावत मतदार यादी वापरण्यात येणार असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. त्यानुसार 27 नोव्हेंबर 2024 ते 30 जून 2025 या सात महिन्यांत महाराष्ट्रातील मतदार संख्येत 18 लाख 80 हजार 553 इतकी वाढ झाली आहे. तर 4 लाख 9 हजार 46 मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. त्यामुळे मतदार यादीत अंतिमतः 14 लाख 71 हजार 507 इतकी वाढ झाली आहे.
परदेशातील नागरिकांचे 6-अ द्वारेही अर्ज
फॉर्म क्रमांक 6-अ द्वारे 16 लाख 83 हजार 573 परदेशी नागरिकांनी नावे नोंदवण्यासाठी अर्ज सादर केले. या सर्व अर्जांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच मतदार यादी अंतिम करण्यात आल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
या जिह्यांत सर्वाधिक नवमतदार
- मुंबई शहर – 18,741
- मुंबई उपनगर – 95,630
- ठाणे – 2,25,866
- रायगड – 52,440
- पुणे – 1,82,490
- नागपूर – 70,693
- नाशिक – 67,789
- कोल्हापूर – 34,313
- अहिल्यानगर – 47,015





























































