रेल्वेच्या दोन अभियंत्यांवर अटकेची टांगती तलवार, ठाणे न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला; मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरण

मुंब्रा रेल्वे अपघातप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या विशाल डोळस आणि समर यादव या रेल्वेच्या दोन अभियंत्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज आज ठाणे न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे अटकेची टांगती तलवार असून या दोन्ही अभियंत्यांच्या वकिलांनी अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान रेल्वेच्या अपघातानंतर आरोप-प्रत्यारोप करणारे रेल्वे पोलीस आणि रेल्वे प्रशासनामध्ये आणखी वाद चिघळणार आहेत.

मध्य रेल्वेच्या मुंब्रा स्थानकादरम्यान ९ जून रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास लोकलमधून पडून पाच जणांचा मृत्यू तर ८ प्रवासी जखमी झाले होते. या अपघाताच्या पाच महिन्यांनंतर व्हीजेटीआयच्या अहवालानुसार विशाल डोळस आणि समर यादव या मध्य रेल्वेच्या दोन अभियंत्यांवर ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याच्या निषेधार्थ रेल्वे युनियनने ६ नोव्हेबरला अचानक पुकारलेल्या आंदोलनामुळे रेल्वे प्रवाशांचे अतोनात हाल झाले, यात तीन प्रवाशांना नाहक आपले जीवदेखील गमवावे लागले होते. अभियंत्यांचे वकील बलदेवसिंग राजपूत यांनी बाजू मांडताना हा अपघात पोलिसांच्या चुकीमुळे झाल्याचा युक्तिवाद केला. तर पुढील सुनावणीत जे हवे आहे ते सर्व पुरावे आम्ही देऊ त्यासाठी अटक करण्याची गरज नसल्याचा युक्तिवाद करून तपास अधिकाऱ्यांवर दोषारोप केले होते. त्यानंतर युक्तिवाद ऐकून न्यायमूर्ती जी. टी. पवार यांनी आदेश प्रलंबित ठेवले.