बिहार निवडणुका हायजॅक, ज्ञानेश कुमार यांचे अभिनंदन – संजय सिंह

“मी तीन महिन्यांपूर्वी म्हटले होते की, बिहार निवडणुका हायजॅक झाल्या आहेत. ८० लाख मते चोरल्याबद्दल अज्ञेनेश कुमार यांचे अभिनंदन”, अशी टीका आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी केली आहे. बिहार विधानसभा निवडणूक निकालांवर आपलॆ प्रतिक्रिया देताना ते असं म्हणाले आहेत.

माध्यमांशी संवाद साधताना संजय सिंह म्हणाले आहेत की, “मी आधीच सांगितले होते की, ही निवडणूक हायजॅक झाली आहे आणि ती निरर्थक आहे. ज्ञानेश कुमार यांनी बिहारमध्ये मोदींना विजयाचे प्रमाणपत्र दिले आहे. ज्या राज्यात ८० लाख मते वगळण्यात आली आहेत, ५ लाख मते डुप्लिकेट आहेत आणि १ लाख मते अज्ञात आहेत, त्या राज्यात निकाल काय असतील? ज्ञानेश कुमार यांच्या आशीर्वादाने बिहार निवडणूक जिंकल्याबद्दल आपण एनडीए, मोदी आणि ज्ञानेश कुमार यांचे अभिनंदन केले पाहिजे.”

संजय सिंह पुढे म्हणाले, “दिल्ली निवडणुकीपूर्वी केजरीवाल यांच्या मतदारसंघात ४०,००० मते वगळण्यात आली होती. जर इतर राज्यातील लोक तिथे मतदान करण्यासाठी जात असतील तर, ही कोणत्या प्रकारची निवडणूक आहे? हे निकाल आधीच जाहीर झाले होते. आम्ही आज जाहीर होण्याची वाट पाहत होतो.”