दुबईत सर्वात उंच हॉटेल खुले; 377 मीटर उंच, 82 मजले आणि 1004 खोल्या! बुकिंगसाठी उत्साह

दुबईत सर्वात उंच हॉटेल बांधण्यात आले असून त्याची उंची कुतुबमिनारपेक्षा पाच पट जास्त आहे. सीएल दुबई मरिना असे हॉटेलचे नाव आहे. 377 मीटर उंच, 82 मजले आणि 1004 आलिशान खोल्या असलेले हॉटेल 15 नोव्हेंबरपासून खुले होणार आहे. हे जगातील सर्वात उंच हॉटेल बनले असून त्याने विश्वविक्रमी 356 मीटर उंच गेव्होरा हॉटेलला मागे टाकले आहे. दुबई मरिनामधील आलिशान थाट अनुभवण्यासाठी ग्राहकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. ओपनिंगआधीच रुम्स बुकिंगला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

खासीयत काय?
या हॉटेलमध्ये 7 रेस्टॉरंट्स, 61 व्या मजल्यावर एक लक्झरी स्पा आणि जगभरातील पाहुण्यांसाठी सर्वोत्तम सुविधा असतील. 81 व्या मजल्यावर भव्यदिव्य क्लब असेल.

अख्खे हॉटेल पूर्णपणे काचेचे डिझाइन केलेले असून येथून लोकांना पाम जुमेराह आणि अरबी आखाताचे दृश्य पाहायला मिळेल. जगातील सर्वात उंच इन्फिनिटी पूल सर्वात आकर्षक वैशिष्टय़ आहे. तो 77 व्या मजल्यावर असेल.

दुबईच्या मरिनाच्या एन्ट्री गेटवर सील दुबई मरिना हॉटेल स्थित आहे, जिथून मरिना बोर्डवॉक, शॉपिंग मॉल, बीच आणि ट्राम-मेट्रोपर्यंत सहज प्रवेश मिळतो. प्रसिद्ध पाम जुमेराह, अपटाऊन दुबईदेखील जवळ आहे.

ओपनिंगच्या दिवशी एका रुमचे एका रात्रीचे भाडे 1310 दिरहम म्हणजे साधारण 30 ते 31 हजार रुपये एवढे ठेवण्यात आले आहे, तर वरच्या मजल्यांवरील प्रीमियम सुईट्सचे भाडे सुमारे 2400 दिरहम म्हणजे 56400 रुपये एवढे असेल.