>> आशिष बनसोडे
कळत, नकळत घडलेला गुन्हा… त्यामुळे नशिबी आलेला तुरुंगवास… चार पोलादी भिंतीच्या आड भोगावे लागलेले एकाकी जीणे, लेकरांची, कुटुंबाची झालेली ताटातूट… अशा अवस्थेत जगणाऱ्या महिला कैद्यांना भायखळा कारागृह प्रशासनाने आज बालदिनानिमित्त आगळीवेगळी भेट दिली. शिक्षा भोगणाऱ्या कैदी महिलांना त्यांच्या मुलांची गळाभेट करून दिली. आईच्या प्रेमाला पारखे झालेल्या त्या चिमुकल्यांनी आईला बघताच घट्ट मिठी मारली. आई तुझ्याविना जगू कसा मी सांग… हीच भावना त्या मुलांची होती. मायलेकरांच्या डोळय़ात अश्रूंचा पूर पाहून अधिकारी, कर्मचारीदेखील हेलावले.
बालदिन आज सर्वत्र साजरा करण्यात आला. पण बरीच मुलं अशी आहेत की, त्यांच्या माता कारागृहाच्या चार पोलादी भिंतीच्या आत खितपत पडल्या आहेत. त्या मातांच्या मुलांनाही आपल्या आईसोबत बालदिन साजरा करता यावा याकरिता भायखळा कारागृह अधीक्षक विकास रजनलवार यांनी आज गळाभेटीचा कार्यक्रम आयोजित केला होता. यामुळे 18 वर्षांखालील 39 मुलांनी कारागृहात असलेल्या 25 मातांची भेट घेऊन आपल्या आईसोबत मनसोक्त गप्पा मारल्या. आपल्या लेकरांना कुशीत घेतल्यावर मातांचेही मन भरून आले होते. आनंद टेंगले, संदीप चव्हाण, संतोषी कोळेकर, अमृता दशवंत, गणेश चौधरी, स्मितल पाटील आदींनी हा गळाभेटीचा कार्यक्रम यशस्वी केला.
आई, लवकर घरी ये…
आईची रजा घेताना मुलांचे डोळे भरले होते. आई, लवकर घरी ये गं… असे सांगत कारागृहाबाहेर पडताना मुलांना अश्रू अनावर झाले, तर मातांचाही जीव कासावीस झाला होता. 39 मुलांना आज आम्ही बालदिनाच्या निमित्ताने त्यांच्या आईशी गळाभेट करून दिली. त्यामुळे दोघांनाही आम्हाला आनंद देता आल्याचे अधीक्षक विकास रजनलवार यांनी सांगितले.























































