रांचीमध्ये दुर्देवी घटना! हटिया धरणात न्यायाधीशांच्या दोन अंगरक्षकांसह तिघांचा बुडून मृत्यू तर एक जण बेपत्ता

झारखंडच्या रांचीमध्ये दुर्देवी घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा हटिया धरणात गाडी कोसळल्याने जमशेदपूरच्या प्रधान जिल्हा न्यायाधीशांच्या दोन अंगरक्षकांसह तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर एकाचा मृतदेह बेपत्ता आहे. ही घटना  नागरी पोलिस स्टेशन येथील हटिया धरणावर घडली, अशी माहिती हटियाचे पोलीस उपअधीक्षक प्रमोद मिश्रा यांनी दिली.

शनिवारी सकाळी चौघेजण गाडीने जमशेदपूरहून जात असताना गाडी हटिया धरणाजवळ अनियंत्रित झाली आणि धरणात जाऊन पडली. धरणात पडल्यानंतर त्यांचा शोध घेतला असता चालकासह दोन अंगरक्षकांचे मृतदेह सापडले तर एकाचा शोध सुरु आहे. तर चौथ्या पोलिसाचाही मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यांचा शोध सुरु आहे. चारही पोलिसांपैकी दोन पोलीस जमशेदपूरच्या प्रधान जिल्हा न्यायाधीशांचे अंगरक्षक होते आणि एक सरकारी चालक होता. धरणात गाडी पडल्याने सर्वांचा बुडून मृत्यू झालाय.  उपेंद्र कुमार आणि रॉबिन कुजू अशी दोघांची ओळख पटलेली आहे. दरम्यान घटनेनंतर शोधमोहिमेदरम्यान दोन शस्त्रेही सापडली.

शनिवारी, अधिकाऱ्यांनी चालक आणि दोन पोलिस अंगरक्षकांचे मृतदेह सापडल्याची पुष्टी केली. पोलिस उपअधीक्षक प्रमोद मिश्रा यांनी सांगितले की, प्राथमिक तपासात चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उलटून पाण्यात बुडाल्याचे दिसून येत आहे.  तपास सुरू असताना बेपत्ता व्यक्तीचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.