संस्कृतायन – वसंत बहार

>> डॉ. समिरा गुजर जोशी 

सत्य आणि अद्भुताचा मिलाफ दर्शवणाऱया कालिदासांच्या रचना कुमारसंभवमधील या वसंत आणि कामदेवाच्या आगमनाचे वर्णन करणाऱ्या काव्यात दिसून येते. अप्रतिम गोडवा असणारे आणि शब्दालंकाराने नटलेल्या या काव्याचे रसग्रहण करताना आपल्याही चित्त वृत्ती बहरतात.

कालिदासाच्या शैलीचे एक वैशिष्टय़ म्हणजे सत्य आणि अद्भुत याचा मिलाफ. मेघदूतामध्ये ज्याप्रमाणे यक्ष सहजपणे म्हणतो, “ढग हा बोलून चालून निर्जीव आहे. वारा, धूळ, पाणी यांच्या समुच्चयाने तो तयार झाला आहे. हे काय मला कळत नाही का? पण कामातुर झालेल्या व्यक्तीला सजीव, निर्जीव यामध्ये कुठे फरक कळतो.’’ आधुनिक काळातील हिरोही ‘कबूतर जा जा’ म्हणताच की! अशा प्रकारे कालिदास खरं आणि काल्पनिक यांची बेमालूम सरमिसळ करतो. कुमारसंभव या काव्यात असाच एक प्रसंग आहे. देवांनी भगवान शंकर यांच्या मनात प्रेम जागं करण्याची जबाबदारी कामदेवावर सोपवली आहे. त्याच्या सोबतीला त्याचा मित्र ऋतू वसंत आहे. आता ही कामगिरी पार पाडण्याच्या उद्दिष्टाने हिमालयाच्या तपोभूमीत दोघेही प्रवेश करतात. वसंत ऋतूचा हा प्रवेश ऋतुचक्रानुसार झालेला नाही. अचानक झालेला आहे. याला संस्कृतमध्ये अकालीकी मधुप्रवृत्ती असे म्हटले गेले आहे. वसंताचे हे आगळेवेगळे वर्णन वाचण्यासारखे आहे. यात वसंताचे वर्णन आहेच, पण ते बिनमौसम झाल्यामुळे काय गमती-जमती झाल्या आहेत हे सांगायला कालिदास विसरत नाही.

अचानकपणे वसंत आल्याने सूर्याने उत्तरायण सुरू केले. तो दक्षिण दिशेपासून असा अचानक दूर झाल्याने दक्षिण दिशेने जे दीर्घ निश्वास सोडले, तेच सुगंधी मलायनिल बनून वाहू लागले. अशोकाचा वृक्ष अचानक पालवी आणि फुलांनी बहरला. एरवी असा प्रघात आहे की, सुंदर स्त्राrने आपल्या पैजणांनी सजलेल्या नाजूक पायाने स्पर्श केल्यावर अशोक वृक्ष बहरतो, पण वसंताच्या अचानक आगमनाने या फॉर्मलिटिस करण्यास जणू वेळच मिळाला नाही. आंब्याचा वृक्षही असाच पालवी आणि मंजिऱ्यांनी सजला.

कामदेवाचे धनुष्य ही सुंदर कल्पना संस्कृत साहित्यात वारंवार येते. अशोक, मल्लिका, माधवी, कमल, निलोत्पल या पाच फुलांचे बाण असणारे गोड उसाचे धनुष्य कामदेव हाती धारण करतो अशी ही कल्पना आहे. कामदेवही हातात धनुष्य धारण करतो. प्रेमात धनुष्य बाणाचे फारच महत्त्वाचे स्थान आहे असे दिसते. नजरेचे बाण असेही म्हटले जाते. त्यात पुढे जाऊन भुवयांना धनुष्याची उपमा दिली जाते. कारण आकारातली वक्रता दोन्ही ठिकाणी आहे. म्हणूनच कधी कधी मदनाचे हे धनुष्य थेट सुंदर स्त्राrच्या हाती येते. कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणतात ना, “हाती धनुष्य ज्याच्या त्याला कसे कळावे हृदयात बाण ज्याच्या त्यालाच दुःख ठावे.’’ आपल्या परंपरेतील हे असे अस्सल रोमँटिक विचार आता थोडेसे विस्मरणात गेले आहेत. कालिदास मात्र म्हणतो, वसंत ऋतूत फुलणारा आंब्याचा मोहर हाही कामदेवाचा सहावा बाण मानायला हवा. सर्वत्र फुलांवर भुंगे गुंजारव करत फिरत आहेत… ही जणू कामदेवाची स्वागताची अक्षरे ठायी ठायी दिसत आहेत. भ्रमरांना त्याने वसंताचे काजळही म्हटले आहे. तिलक वृक्षाची फुले त्याचे तिलक आहेत, तर आंब्याच्या पालवीचा लालिमा म्हणजे वसंताच्या चेहऱयावरची लाली आहे. त्याचा स्वर म्हणजे कोकीळ कूजन. आता कदाचित असे वाटेल की, हे वर्णन सांकेतिक आहे, पण अशा टप्प्यावर कालिदास आपल्याला त्याचा सुवर्ण स्पर्श दाखवतो.

निसर्गात अचानक वसंताचे आणि कामदेवाचे आगमन झाल्यानंतर सगळ्यांच्याच चित्त वृत्ती बहरल्या आहेत. पशुपक्ष्यांमध्ये प्रणय रंगात आला आहे. त्याचे वर्णन करताना दोन खूप सुंदर दृश्ये कालिदास रंगवतो. आता नर आणि मादी भुंगे एकाच फुलाच्या पात्रातून रसपान करत आहेत. एखाद्या गोष्टीचा एकत्र आस्वाद घेण्याची ओढ प्रेमात असतेच ना! पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे प्रेमात एकमेकांवर असणारा अपार विश्वास. आपला प्रियजन आपल्याला दुखावणार नाही याची किती खात्री असते प्रेमिकांना. अशा सच्च्या प्रेमाचे एक दृश्य कालिदासाच्या लेखणीतून अवतरते. तो एका हरिणीकडे आपले लक्ष वेधून घेतो. स्पर्श सुखाने ती रोमांचित झाली आहे. तिचा प्रियकर म्हणजे नर काळवीट हरिण आपल्या शिंगांनी तिच्या डोळ्याजवळ खाजवत आहे आणि तरी ती केवळ निर्धास्त नाही तर सुखावली आहे.

असे प्रेमाचे प्रसंग त्याला निसर्गात ठाई ठाई दिसत आहेत. कुठे हत्तीणी कमळाया सुवासिक जलाचे फवारे आपल्या सोंडेने हत्तीवर उडवीत आहेत, तर कुठे चक्रवाक पक्षी कमळाचे देठ चाखून ते चविष्ट आहेत याची खात्री करून आपल्या मादीला भरवत आहेत. किन्नर गीत गाता गाता आपल्या प्रेयसीचे चुंबन घेत आहेत. बहरून आलेल्या लता वेलींनी आपल्या वृक्ष सख्यांना घट्ट आलिंगन दिले आहे.

असा प्रेममय निसर्ग टिपण्याचे कौशल्य एक कालिदासच दाखवू शकतो, पण हे केवळ त्याच्या कल्पनेतील वातावरण नाही. तेव्हा भारतात शृंगाराविषयी जी वेगळी दृष्टी होती त्याचेही हे दर्शन आहेच.

(लेखिका निवेदिका, अभिनेत्री आणि संस्कृत – मराठी वाङमयाच्या अभ्यासक आहेत.)

[email protected]