10 हजारात लोकशाही विकली जाते हे बिहारमध्ये दिसले, संजय राऊत यांचा निशाणा

भाजपच्या नेतृत्वातील एनडीएने बिहार विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 243 पैकी 202 जागांवर पाशवी बहुमत मिळवले आहे. या निवडणुकीतील जनमत आणि मतमोजणीतील तफावत यामुळे निवडणूक निकालाबाबत संशय व्यक्त केला जात आहे. यावरून सध्या निवडणूक आयोग व केंद्रातील भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे.

भाजपप्रणीत एनडीएने निवडणुकीपूर्वी बिहारमधील प्रत्येक महिलेला 10 हजार रुपये दिले होते. मतचोरीसोबतच या महिलांचा एनडीएच्या विजयात मोठा हात असल्याचे बोलले जात आहे. त्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा पाठमोर फोटो शेअर केला असून त्यांच्या हातात दहा हजार रुपये आहेत. त्यासोबत त्यांनी ’10 हजारात लोकशाही विकली जाते हे बिहारमध्ये दिसले’, अशी पोस्ट शेअर केली आहे.

निवडणूक आयोग आणि बीजेपी यांचे हातात हात

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून निवडणूक आयोग आणि भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, बिहारच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाने धक्का बसण्याची गरज नाही. निवडणूक आयोग आणि बीजेपी यांचे हातात हात घालून जे राष्ट्रीय कार्य सुरू होते ते पाहता यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते. हा एकदम महाराष्ट्र पॅटर्न आहे. जी आघाडी सत्तेवर येणार याची खात्री होती, त्यांना 50च्या आत संपविले, असे टीकास्त्र संजय राऊत यांनी सोडले.