जागतिक शेअर बाजारातील तेजीचा फुगा फुटणार, जगाची मंदीकडे वाटचाल; दिग्गज तज्ज्ञाने दिला गंभीर इशारा

जागतिक शेअर बाजारात सध्या तेजीचे वातावरण दिसत आहे. मात्र, जागतिक अर्थव्यवस्थेत असलेल्या धोक्याबाबत काही तज्ज्ञांनी गंभीर इशारा दिला आहे. प्रसिद्ध लेखल रॉबर्ट कियोसाकी यांनी जागतिक मंदी आली असून सोने आणि चांदीमध्येच गुंतवणूक करावी, कठीण काळात हीच गुंतवणूक साथ देणार असल्याचा सल्ला अनेकदा दिला आहे. आता 2008 च्या जागतिक मंदीचे भाकित करणारे तज्ज्ञ मायकल बरी यांनीही जागतिक शेअर बाजार आणि जागतिक अर्थव्यवस्थेबाबत गंभीर इशारा दिला आहे.

तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात नफा होत असल्याच्या वृत्तानंतर त्यांनी हा इशारा दिला आहे. मायकल बरी यांनी म्हटले आहे की, कॉर्पोरेट आणि तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात दिसणारा नफा गंभीर शंका निर्माण करत आहे. या कंपन्यांच्या वाढत्या कमाईमुळे आणि एआयवरील सततच्या खर्चामुळे बिग टेक कंपन्यांवरील बाजारपेठेचा विश्वास वाढला आहे. मात्र, या कंपन्यांच्या नफ्यात लक्षणीय धोके आहेत. या घडामोडींकडे लक्ष वेधत त्यांनी पुन्हा एकदा जागतिक मंदीचा इशारा दिला आहे. याआधी त्यांनी 2008 मधील महामंदीचे भाकीत केले होते.

एका सोशल मीडिया पोस्टमध्ये बरी यांनी मेटा आणि अल्फाबेट सारख्या कंपन्यांच्या नफ्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की सर्व्हर, चिप्स आणि इतर एआय पायाभूत सुविधांवरील तोटा वाढवून, या कंपन्या निव्वळ उत्पन्नावर परिणाम करणारे नॉन-कॅश खर्च कमी करत आहेत. याचा अर्थ नफ्यात प्रत्यक्ष वाढ न होता कागदावर फक्त जास्त नफा दाखवण्यात येत आहे. एआय मूल्यांकनात थोडीशी सुधारणा देखील मोठ्या प्रमाणात बाजारातील घसरण सुरू करू शकते, कारण काही टेक दिग्गजांकडे बेंचमार्क निर्देशांकातील कॅश फ्लो नसल्याचे दिसून येते. अनेक कंपन्या ऑपरेशन्सचा खरा खर्च लपवतात आणि फकर्त कागदावरच नफा दाखवतात, हे अर्थव्यवस्थेसाठी धोक्याचे ठरत असल्याचेही ते म्हणाले.

जागतिक शेअर बाजारातील तेजीमुळे अनेक गुंतवणूकदार आणि तज्ञ बाजाराबाबत प्रंचड आशावादी आहेत. मात्र, जागतिक शेअर बाजारातील तेजीचा फुगा लवकरच फुटणार असून आपण जागतिक मंदीकडे वाटचाल करत आहोत, त्यामुळे गुंतवणूकदारांनी सतर्कतेने गुंतवणुकीबाबत निर्णय घ्यावेत, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.