अल फलाह विद्यापीठाविरुद्ध २ एफआयआर दाखल, दिल्ली पोलिसांची कारवाई

अल फलाह विद्यापीठाविरुद्ध दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोन फौजदारी गुन्हा दाखल (FIR) केले आहेत. विद्यापीठातील अनियमिततांबाबत विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) आणि राष्ट्रीय मूल्यमापन व मान्यता परिषदेने (NAC) केलेल्या तपासात गंभीर त्रुटी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. यानुसार, विद्यापीठाच्या ओखला येथील कार्यालयात पोलिसांनी छापा टाकला असून, आवश्यक कागदपत्रांची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पहिला एफआयआर विद्यापीठातील फसवणूक प्रकरणात (कलम १२ चे उल्लंघन) दाखल करण्यात आला आहे, तर दुसरी एफआयआर खोट्या मान्यता दाव्यांबाबत नोंदवण्यात आली आहे. या प्रकरणात दोन डॉक्टरांसह तीन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. या अटक केलेल्या व्यक्ती लाल किल्ल्याजवळील कार स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. उमर नबी यांचे ओळखीचे आहेत.

दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने आणि विविध केंद्रीय संस्थांनी शुक्रवारी रात्री हरियाणातील नूह, धौज आणि परिसरात संयुक्त छापे टाकले. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (NIA) सहकार्याने नूह येथून विद्यापीठातील दोन डॉक्टर- मोहम्मद आणि मुस्तकीम- यांना अटक करण्यात आली. हे दोघेही ‘व्हाईट कॉलर टेरर मॉड्यूल’शी संबंधित असलेल्या डॉ. मुजम्मिल गाणी यांच्याशी संपर्कात होते, ज्यांच्याविरुद्ध तपास सुरू आहे.