
जागतिक मंदीचे सावट, वाढती महागाई तसेच अमेरिकेचे बदलते व्यापार धोरण यामुळे येत्या काळात हिंदुस्थानातील मध्यमवर्गीयांच्या सुमारे 2 कोटी नोकऱया धोक्यात येऊ शकतात, अशी भीती ज्येष्ठ अर्थतज्ञ सौरभ मुखर्जी यांनी व्यक्त केली. आयटी, बँकिंग, ई-कॉमर्स यासारख्या क्षेत्रातील नोकऱयांवर हा परिणाम दिसेल, असे त्यांनी सांगितले.
एका पॉडकास्टमध्ये ते बोलत होते. ‘हिंदुस्थानातील मध्यमवर्गीयांच्या नोकऱयांसमोर गिग अर्थव्यवस्था आणि अमेरिकेच्या बदलत्या धोरणांचे आव्हान असेल. वार्षिक 2 ते 5 लाख रुपये पगार घेणाऱयांच्या नोकऱया धोक्यात येऊ शकतात. ट्रम्प यांनी टॅरिफ मागे न घेतल्यास नाताळपर्यंत 2 कोटी हिंदुस्थानी कामगारांच्या नोकऱया जाण्याचा धोका आहे, असे मुखर्जी म्हणाले.
येणारा काळ कठीण
हिंदुस्थानात मध्यमवर्गीयांवर गृहकर्ज वगळता इतर घरगुती कर्जाचे प्रमाण हे 33-34 टक्के आहे. हे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. अर्थव्यवस्थेचे चित्र पाहता असे कर्ज फेडण्यास बराच वेळ लागू शकतो. त्यामुळे येणारा काळ कठीण आहे, असे मुखर्जी म्हणाले.

























































