IND Vs SA – जडेजाच्या फिरकीने गाजवले मैदान! दक्षिण आफ्रिका दुसऱ्या डावात 7 बाद 93

ईडन गार्डन्सवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात टीम इंडिया विजयाच्या दारात उभी आहे. शनिवारी (दि. 15) खराब हवामानामुळे सलग दुसऱया दिवशी अपुऱ्या प्रकाशामुळे खेळ लवकर थांबला असला तरी गोलंदाजांनी शानदार कामगिरी करीत पाहुण्यांची अवस्था 7 बाद 93 अशी वाईट केली. या सर्व विकेट फिरकीपटूंनी घेतल्या.

पहिल्या डावात आफ्रिकेच्या 159 धावांच्या उत्तरात हिंदुस्थानने 189 धावा केल्या. पहिल्या डावात मोठी आघाडी अपेक्षित असताना फलंदाजांच्या हाराकिरीमुळे हिंदुस्थानला अवघ्या 30 धावांच्या आघाडीवर समाधान मानावे लागले. यानंतर पहिल्या डावाप्रमाणे दुसऱया डावातही आफ्रिकेची घसरगुंडी उडाली. त्यांच्या 35 षटकांत 7 बाद 93 धावा झाल्या असताना पंचांनी वाईट प्रकाशामुळे खेळ थांबवला.

शनिवारी ईडन गार्डन्स स्टेडियमवर 77 षटके टाकली गेली. पुरेशा प्रकाशाअभवी 13 षटके शिल्लक राहिली. कर्णधार टेम्बा बावुमा 29 धावांवर झुंज देत आहे हीच काय आफ्रिकेसाठी दिलाशाची बाब ठरली.

तत्पूर्वी, टीम इंडियाने पहिल्या डावात 9 बाद 189 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल पहिल्या सत्रात मानेच्या दुखापतीमुळे निवृत्त झाला आणि त्यानंतर त्याने फलंदाजी केली नाही. के. एल. राहुलने सर्वाधिक 39 धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून सायमन हार्मरने चार आणि माकाx यान्सनने तीन बळी घेतले. केशव महाराज आणि कॉर्बिन बॉशने प्रत्येकी एक बळी घेतला.

हिंदुस्थानतर्फे रवींद्र जडेजाने सर्वाधिक चार, कुलदीप यादवने दोन, तर अक्षर पटेलने एक विकेट घेतली. जडेजाने हिंदुस्थानात 250 कसोटी विकेट्सही पूर्ण केल्या. सामन्याचे आणखी तीन दिवस शिल्लक असल्याने टीम इंडियाचा विजय निश्चित मानला जात आहे.