IND Vs SA – तिसऱ्या दिवशीच गोंडगोल!

>> संजय कऱ्हाडे

दादा, एखाने गोंडगोल चोलबे ना, असं सौरवदादाला स्पष्ट शब्दांत सांगायलाच हवं. अडीच दिवसांत कसोटी सामना फिनितो? याला काय अर्थ आहे? आपल्या संघव्यवस्थापनाने फिरकीला साथ देणारी खेळपट्टी मागितली असेलही. पण दादा, तुझ्या बंगाल क्रिकेट संघटनेने ज्या प्रकारची खेळपट्टी उपलब्ध केली त्याला खेळपट्टी नव्हे तर केवळ गोंडगोल असंच म्हणतात! दुसऱया संध्याकाळपर्यंत सत्तावीस फलंदाज बाद झालेत. पहिल्या डावात बुमरा-सिराजचे सात, दुसऱया डावात यांन्सन-बॉशचे चार सोडले तर फिरकीबहाद्दरांनी तब्बल पंधरा फलंदाज बाद केलेत! त्यात काल उल्लेखलेल्या महाराज आणि हार्मरनेही आपापला वाटा उचललाच!

एक शुभमन तेवढा मानेच्या दुखापतीने निवृत्त-बाद झाला. त्याच्या दुखापतीने मी व्यथित झालोय. पण एक विनोद करण्यापासून मला राहवत नाहीये! त्याच्या तशा बाद होण्यामध्ये कप्तान झाल्यापासून त्याने निभावलेली ‘होयबा’ची भूमिका किती जबाबदार आहे हे माझ्या ठावकी नाही!

थोडक्यात, जी काही गोंडगोल खेळपट्टी सौरव अध्यक्ष असलेल्या संघटनेने उपलब्ध केली त्यावर टीकेची झोड उठली आणि त्याबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट काwन्सिलकडे तक्रार झाली तर नवल वाटायला नको! दक्षिण आफ्रिकेच्या दुसऱया डावात जडेजा अन् कुलदीपने घातलेला धिंगाणा पाहून उभरत्या क्रिकेटपटूंनी आणि पाश्चात्य देशांनी कसोटी क्रिकेटच्या नावाने खडे पह्डले नसतील तरच आश्चर्य! इंग्लंडविरुद्ध नुकतीच बरोबरीत पार पडलेली कसोटी मालिका क्रिकेटची सर्वोत्तम पाठराखण करून गेली असं सर्वच पंडितांनी एकमुखाने मान्य केलं. मात्र आता ही केवळ तिसऱया दिवशी संपलेली कसोटी पाहून काय म्हणायचं तेच कळत नाहीये!

अशा खेळपट्टय़ा आपल्याला सतत विजय मिळवून देतील, पण जिंकण्याचं समाधान देऊ शकणार नाहीत! आपल्या फिरकी गोलंदाजांना अनेकानेक बळी मिळवून देतील, पण काwशल्य, कसब आणि चतुरस्र लौकिक मिळवून देणार नाहीत! उलट, ‘अपने गली के शेर’ असं बालंट मात्र आपल्या माथी मढलं जाईल!

बरं, अशा खेळपट्टय़ांवर आपल्या फलंदाजांना आत्मविश्वासाने खेळता तरी येतंय का! न्यूझीलंडचा संघ आपल्याला, आपल्याच घरी, आपणच बनवलेल्या खेळपट्टय़ांवर 3-0 अशी तुरी देऊन मिश्कीलपणे, गालातल्या गालात हसत ताठ मानेने परतला! अगदी विंडीजासारख्या दुबळय़ा संघाचं द्या सोडून; पण केशव महाराज आणि त्याच्या तुलनेत नवखा हार्मरसुद्धा आपल्या धुरंदर फलंदाजांना झेपला नाही! आतापर्यंत एकही फलंदाज अर्धशतक नोंदवू शकला नाही! राहुलने सर्वाधिक धावा (39) केल्या! काय म्हणायचं! हा नवखा हार्मर छत्तीस वर्षांचा आहे, फक्त बारा कसोटी खेळलाय, पण तेवढयात त्याने बावन्न गडी बाद केलेले आहेत! आज आफ्रिकेकडे 63 धावांची आघाडी अन् तीन फलंदाज शिल्लक आहेत. तेही लवकरच बाद होतील अन् यथावकाश आपण कसोटी जिंकू. मात्र किंतु, परंतु… हा विजय घनदाट वृक्षाच्या नव्हे तर इमारतीच्या सावलीसारखा असेल!