नरभक्षक बिबट्याला ठार करा, निंबळक गावासह बायपास चौकात रास्ता रोको

नरभक्षक बिबट्याला ठार करा, अशी मागणी करत इसळक, निंबळक, खारेकर्जुने गावांतील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत आज सकाळी निंबळक गावात आणि निंबळक बायपास चौक येथे रास्ता रोको आंदोलन केले. बिबट्याला ठार मारल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. या रास्ता रोको आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

पंचायत समितीचे माजी उपसभापती डॉ. दिलीप पवार, प्रताप शेळके, अजय लामखडे, जालिंदर कदम, अंकुश शेळके, बी. डी. कोतकर, घनशाम म्हस्के, नाना दिवटे यांच्यासह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. खारेकर्जुने येथील चिमुकलीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच शुक्रवारी सायंकाळी निंबळक येथील एका आठवर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला केला. या घटनेने इसळक, निंबळक, खारेकर्जुने, नवनागापूर, हिंगणगाव, वडगाव गुप्ता परिसरातील नागरिक दहशतीखाली आहेत. या भागातील ग्रामस्थांनी आज सकाळी निंबळक गाव आणि बायपास चौकात रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे वाहनाच्या दुतर्फा लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

वन विभागाचे अधिकारी आणि पोलीस प्रशासनाने रास्ता रोको आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, ग्रामस्थांनी नरभक्षक बिबट्याला ठार मारत नाहीत; तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका स्पष्ट केली. इसळक, निंबळक गावांतील ग्रामस्थांनी दुपारपर्यंत गाव बंद करत दोन्ही गावांतील शाळा बंद ठेवल्या होत्या. पाच वाजेपर्यंत बिबट्याला ठार मारण्याचा आदेश येईल, असे लेखी निवेदन दिल्यानंतर रास्ता रोको स्थगित करण्यात आले.