
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बस डेपोत शुक्रवारी बेवारस बॅगमुळे खळबळ उडाल्याची घटना ताजी असतानाच आज मेट्रोच्या गुंदवली स्थानकात बेवारस बॅगमुळे घबराट पसरली होती. पोलीस व बॉम्बशोधक व नाशक पथकाने त्या बॅगेची तपासणी केल्यावर संशयास्पद काहीच मिळून आले नाही.
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर सर्वत्र सुरक्षेची विशेष काळजी घेतली जात असताना शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बस डेपोत एक बेवारस बॅग आढळल्याने खळबळ उडाली होती; परंतु तपासांती त्या बॅगेत कपडे व कागदपत्रे मिळून आली. अशीच घटना आज मेट्रोच्या गुंदवली स्थानकात घडली. एक महिला स्थानकाच्या पहिल्या मजल्यावर आपल्या सामानासह बसली होती; परंतु जाताना ती बॅग तेथेच विसरून गेली. नागरिकांच्या ती बेवारस बॅग नजरेस पडताच त्यांनी तत्काळ सुरक्षा यंत्रणेला कळविले. मग अंधेरी व दिंडोशी पोलिसांनी तेथे धाव घेतली. तसेच श्वान पथक तसेच बॉम्ब शोधक व नाशक पथकाने तेथे जाऊन बॅगेची तपासणी केल्यावर बॅगेत संशयास्पद काहीच आढळून आले नाही. या घटनेमुळे काही काळ मात्र स्थानकात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.


























































