
भाजप आणि अजित पवार गटाचे रायगड जिल्ह्यातील पदाधिकारी हे कारस्थानी आहेत. त्यामुळे महायुतीत बिघाडी झाली असून शिंदे गटाला सावत्र वागणूक दिली जात आहे. प्रत्येक वेळी आमच्यावर जाणूनबुजून अन्याय केला जात आहे, अशी आगपाखड शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी केली आहे. दरम्यान, पेण नगरपालि केच्या निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीने युती करून शिंदे गटाला बाहेरचा रस्ता दाखवल्याने शिंदे गटाची आदळआपट सुरू झाली आहे.
राज्याच्या राजकारणात भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट एकत्र असले तरी रायगड जिल्ह्यात त्यांची बिघाडी झाली आहे. पेण नगरपालिकेची निवडणूक भाजप आणि अजित पवार गट युतीत लढणार आहे. या निवडणुकीतून त्यांनी शिंदे गटाला बाजूला फेकले आहे. यामुळे शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी पत्रकार परिषद घेऊन सहकारी पक्षांवर आणि त्यांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांविरोधात थयथयाट केला. सुनील तटकरे यांची खासदारकी तसेच रवी पाटील यांच्या आमदारकीच्या निवडणुकीतही आम्ही युती धर्म पाळला असे असतानादेखील राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे यांनी महाड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत रायगडामध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाल्याचे जाहीर केले. शिंदे गटाला त्यांनी जाणीवपूर्वक बाजूला ठेवल्याचे दिसून येत आहे. ही घोषणा जरी अनिकेत तटकरे यांनी केली असली तरी त्यामागे संपूर्ण तटकरे कुटुंब असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीत वाद सुरू झाल्याने इच्छुक उमेदवारांची अवस्था केविलवाणी झाली.


























































