
डहाणू तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायतीच्या भाजप सरपंच मेघा शिंगडे यांच्या विरोधात ग्रामपंचायतीतील दहा सदस्यांनी विकास निधीच्या गैरवापरासह अनेक गंभीर आरोप करत सखोल चौकशीची मागणी केली होती.
याप्रकरणी गंभीर दखल घेत डहाणू पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते यांनी चार सदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली आहे. यानुसार ग्रामपंचायतीची दप्तर तपासणी आणि सर्व आरोपांची चौकशी सुरू आहे.
चिंचणी ही डहाणू तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेली आणि मोठ्या उत्पन्नाची ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून विविध वादग्रस्त कारणांमुळे ही ग्रामपंचायत चर्चेत राहिली आहे. सरपंच मेघा शिंगडे यांच्या कारभाराबाबत सदस्यांनीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
डहाणूच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे धाव
दहा सदस्यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार अर्ज दाखल करत विकास निधीचा अपारदर्शक वापर, अनियमित खर्च तसेच सरपंचांच्या पतीचा प्रशासकीय कामकाजात हस्तक्षेप, सरपंच ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित न राहता आपल्या रिसॉर्टवरून कागदपत्रे व धनादेशांवर सह्या करतात, अशा अनेक बाबींचा उल्लेख केला होता. या तक्रारीची दखल घेत डहाणू पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पल्लवी सस्ते यांनी चौकशी समिती गठीत करून संबंधित प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत

























































