ऑपरेशन सिंदूरचा काहीही सकारात्मक फायदा झाला नाही, फारुक अब्दुल्ला यांचे मत

जम्मू-कश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांनी पुन्हा एकदा हिंदुस्थान -पाकिस्तान संबंधांवर मोठे वक्तव्य केले आहे. दोन्ही देशांनी आपल्या संबंधांना सुधारण्याच्या दिशेने काम करायला हवे. यासोबतच त्यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल बोलताना सांगितले की या ऑपरेशनमुळे काहीही साध्य झाले नाही असेही अब्दुल्ला म्हणाले.

फारूक अब्दुल्ला म्हणाले की, पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हिंदुस्थानने केलेल्या अचूक हल्ल्यांना ‘ऑपरेशन सिंदूर’ असे म्हटले जाते, परंतु या ऑपरेशनचा कोणताही सकारात्मक परिणाम झाला नाही आणि यात फक्त अनेकांचा मृत्यू झाला. त्यांनी म्हटले, “मला आशा आहे की ऑपरेशन सिंदूरसारखी गोष्ट पुन्हा होणार नाही. या ऑपरेशनमधून काहीही निष्पन्न झाले नाही. आपल्या लोकांचा जीव गेला. आपल्या सीमांवर तडजोड झाली. मला आशा आहे की दोन्ही देश आपले संबंध सुधारतील. हेच एकमेव मार्ग आहे.”

तसेच अशा प्रकारच्या ऑपरेशनची पुनरावृत्ती केल्याने दोन्ही देशांतील आणि नियंत्रण रेषेजवळील शांततेलाच धक्का बसेल. हिंदुस्थान-पाकिस्तान संबंधांवर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रसिद्ध ओळीचा उल्लेख करत अब्दुल्ला म्हणाले, “मी तेच पुन्हा सांगू इच्छितो जे वाजपेयीजी म्हणाले होते. मित्र बदलता येतात, पण शेजारी नाही.” त्यांनी हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांनी पुन्हा संवाद सुरू करावा आणि कायमस्वरूपी शांततेच्या दिशेने काम करावे, असे आवाहन केले.