
नवी दिल्लीत एका 34 वर्षीय विवाहित तरुणाने त्याच्या प्रेयसीचे मुंडके छाटून तिची हत्या केली आहे. मोनू सिंग असे त्या तरुणाचे नाव असून त्याची प्रेयसी प्रिती यादव ही त्याला ब्लॅकमेल करत होती. त्यावरून त्यांचा वाद झाला व त्या रागात मोनूने प्रितीचे मुंडकेच छाटले. या प्रकरणी पोलिसांनी मोनूला अटक केली आहे.
मोनू हा त्याची पत्नी व दोन मुलींसह नोयडा येथे राहत होता. त्याचे प्रिती यादव सोबत अनैतिक संबंध होते. सुरुवातीला सर्वकाही व्यवस्थित होते. मात्र नंतर प्रितीने मोनूला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. मोनूच्या पत्नीला सर्व काही सांगेन अशी धमकी ती त्याला द्यायची. त्यामुळे मोनू आणि तिच्यात वाद होत होते. ती त्याच्याकडून पैसे उकळायला लागली होती. तिने त्याच्या मुलींना देखील चुकीच्या गोष्टींमध्ये अडकवण्याची धमकी दिली होती.
प्रितीच्या सततच्या त्रासाला मोनू कंटाळला होतका. त्यामुळे त्याने एक दिवस प्रितीला भेटायला बोलावले. त्यानंतर त्यांनी गाडीत बसूनच पार्सल आणलेले जेवण जेवले. बोलता बोलता दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर मोनूने स्वत:कडील चाकूने प्रितीचा गळा चिरला. त्यानंतर तिचे हातही कापले. त्याने ते सर्व पिशवीत भरून गाझियाबाद जवळील एका नाल्यात फेकले.
पोलिसांना 6 नोव्हेंबर रोजी प्रितीचा मृतदेह सापडला होता. प्रितीचे मुंडके नसल्याने तिची ओळख पटवणे पोलिसांसाठी खूप कठिण झाले होते. मात्र प्रितीच्या पायातील जोडव्यांच्या मदतीने पोलिसांनी या केसचा छडा लावला. त्यासाठी त्यांनी परिसरातील तब्बल 5000 सीसीटीव्ही कॅमेरे तपासले.


























































