घाणेरडी शिवीगाळ, मारण्यासाठी चप्पल उचलली; घर सोडण्यापूर्वी लालुंच्या कन्येसोबत काय घडलं? स्वत: पोस्ट करत दिली माहिती

बिहार निवडणुकीच्या निकालानंतर लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य सातत्याने आपला आवाज उठवत आहे. आता आणखी एक भावनिक पोस्ट शेअर करत तिने साऱ्यांचे लक्ष वेधले आहे. आताच्या पोस्टमध्ये तिने संजय यादव आणि रमीज यांनी घाणेरडी शिवीगाळ केली आणि मारण्यासाठी चप्पल उचलल्याचा गंभीर आरोप लावला आहे. शिवाय तिने रडत आपल्या आई -वडिलांचे घर सोडल्याचे म्हटले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लालू प्रसाद यादव यांचा कौंटुबिक वाद चव्हाट्यावर आल्याने राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.

रोहिणी आचार्यने शनिवारी राजकारण आणि कुटुंबाशी नाते तोडत असल्याचे एक्सवर ट्विट केल्याने सर्वांमध्ये  चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच तिने आता घाणेरडी शिवीगाळ आणि मारण्यासाठी चप्पल उचलल्याचा गंभीर आरोप करत रडत घर सोडायला भाग पडल्याचे म्हटले आहे. तिने एक्स पोस्टवर म्हटले आहे की, काल एक मुलगी, एक बहिण, एक विवाहीत महिला आणि एका आईला अपमानित केले गेले…तिला घाणेरडी शिवीगाळ करण्यात आली. तिला मारण्यासाठी चप्पल उचलण्यात आली. मी माझा आत्मसन्मानाची तडजोड केली नाही, सत्य सोडले नाही आणि म्हणूनच अपमान सहन करावा लागला.

काल एक मुलगी नाईलाजाने रडत असलेल्या आई-वडिल, बहिणींना सोडून आली, माझं माहेर मला सोडायला भाग पाडले, मला अनाथ बनवण्यात आले, तुम्ही माझ्या मार्गावर चालू नका, कोणत्याही घरी रोहिणीसारखी मुलगी-बहिणी जन्माला न येवो.

रोहिणीने रविवारी सोशल मीडियावर भावूक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने म्हटले आहे की, बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांभोवती उत्साह आणि नवीन सरकार स्थापनेदरम्यान रोहिणी यांची पोस्ट आली आहे. कालच, तिने राजकारण सोडण्याचा आणि कुटुंबापासून वेगळे होण्याचा निर्णय जाहीर केला, ज्यामुळे चर्चांना उधाण आले. दरम्यान, या संपूर्ण वादावर लालू किंवा तेजस्वी यांच्याकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. हा निवडणुकीतील पराभवाचा परिणाम आहे की जुन्या कौटुंबिक तणावाचा उद्रेक आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.