
कुख्यात गुंड रबज्योतसिंग उर्फ गब्या नावाच्या गुंडास वजिराबाद पोलिसांनी गोळीबार करुन ताब्यात घेतले. ही घटना दि.16 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री बाराच्या सुमारास नांदेड शहरातील भगतसिंग रस्त्यावर घडली.
वजिराबाद पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला दि.१६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री शहिद भगतसिंग रस्त्यावर खंडणी, जिवघेणे हल्ले अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला आरोपी रबज्योतसिंग उर्फ गब्या हा दिसला. पोलिसांनी त्याला अटक करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांवर झडप घालून त्याने पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलीस अंमलदार गणेश धुमाळ यांनी बचावात्मक कारवाई करत त्याच्या कंबरेवर गोळी झाडली. यात तो जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. या प्रकरणी गणेश धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रबज्योतसिंघ उर्फ गब्या याच्यावर स्थानिकांना धमकावणे, खंडणी उकळणे, गुन्हेगारी टोळ्यामार्फत वसुली करणे, जिवघेणे हल्ले करणे आदी गंभीर गुन्हे दाखल असून, मागील अनेक वर्षापासून तो फरार होता. दिर्घकाळ पसार असलेल्या गब्याला वजिराबाद गुन्हे शोध पथकाने अटक केली असून, त्यांच्या या कारवाईचे सर्वत्र कौतूक होत आहे.
























































