
परदेशी पाहुणे असलेले सीगल पक्षी हे थव्या थव्याने दापोलीतील समुद्र किनाऱ्यावर दाखल झाल्याने समुद्र किनारे सीगल पक्षांच्या आगमनाने चांगलेच बहरुन गेले आहेत. त्यामुळे येथे आलेल्या पर्यटकांना येथील समुद्र किनारे आकर्षित करत आहेत.
दापोलीत मागील आठवड्यापासून थंडीची चाहूल लागली आहे. रविवारी येथील तापमान 10 अंश सेल्सिअस होते. दापोलीत थंड वातावरणात असल्याने दापोलीची ओळख महाबळेश्वर अशीही आहे. अशा या येथील थंड वातावरणात आनंद घेण्यासाठी दरवर्षीप्रमाणे परदेशी पाहुणे म्हणजे सीगल पक्षी (समुद्रपक्षी) मोठ्या प्रमाणात दापोलीतील समुद्र किनाऱ्यावर दाखल होतात. तसे सध्या दाभोळ , कोळथरे , बुरोंडी , लाडघर , कर्दे , मुरुड , सालदुरे , पाळंदे , हर्णे , आंजर्ले ,आडे , पाडले आणि केळशी येथील समुद्र किनाऱ्यावर मोठ्या संख्येने सीगल (समुद्रपक्षी ) दाखल झाले आहेत. काही दिवसांपासून हर्णे येथील किनारपट्टीवर सीगलचे थवे दिसत आहेत. समुद्रात बागडताना, आकाशात भरारी घेताना सीगल पक्ष्यांचे दृष्य मन हरखून टाकते. समुद्रकिनारी कळप करून हे पक्षी छोटे मासे, किडे आणि खेकड्यांचा शोध घेत असतात. अशा या गोंडस पक्ष्यांना पाहण्यासाठी पर्यटक येतातच शिवाय स्थानिकांचीही गर्दी होत आहे.


























































