हिंदुस्थानात क्षयरोगाच्या रुग्णांत घट; जगात 25 टक्के नवे रुग्ण

जागतिक  आरोग्य संघटनेच्या ग्लोबल टीबरक्युलॉसीस अहवाल 2025 नुसार हिंदुस्थानात क्षयरोगाच्या (टीबी) केसेसमध्ये गेल्या नऊ वर्षांत 21 टक्के घट नोंदली असली तरी देश अजूनही जगातील सर्वाधिक टीबी भार असलेल्या देशांपैकी एक आहे. 2024 मध्ये जगभरातील एकूण नवीन टीबी रुग्णांपैकी तब्बल 25 टक्के रुग्ण हिंदुस्थानातील असल्याचे अहवालात म्हटले आहे.

देशात टीबी रुग्णांची संख्या 2015 मध्ये प्रति लाख लोकसंख्येत 237 होती, ती 2024 मध्ये प्रति लाखांमागे 187 एवढी कमी झाली आहे. मृत्युदरातही काही प्रमाणात सुधारणा झाली असून 2015 मधील प्रति लाख लोकांमागे 28 एवढा होता तो कमी होऊन 21 प्रति लाखांवर आला आहे. निदान क्षमता, डिजिटल एक्स-रे, मॉलिक्युलर चाचण्या आणि ‘निक्षय’ प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून उपचारांमध्ये मोठी सुधारणा झाली आहे. तथापि, पेंद्र सरकारने ठरविलेले ‘टीबी-मुक्त भारत 2025’ हे लक्ष्य अद्याप दूर असल्याचे अहवाल स्पष्ट करतो.

औषध प्रतिरोधक क्षयरुग्णांची वाढ

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार महाराष्ट्रात 2024 मध्ये 2.3 लाख नवीन टीबी रुग्ण आढळले. यापैकी 10 हजारांहून अधिक रुग्ण औषध-प्रतिरोधक (डीआर टीबी) असून हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त असल्याची नोंद आहे. ही बाब चिंताजनक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. राज्यात 2025 च्या पहिल्या दोन महिन्यांतच सुमारे 40 हजार नवीन प्रकरणे आढळल्याने आरोग्य यंत्रणेत चिंता वाढली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या एंड टीबी धोरणानुसार 2025 पर्यंत घटनांमध्ये 50 टक्के घट आणि मृत्युदरात 75 टक्के घट व्हायला हवी होती, परंतु देश त्या गतीने पुढे सरकू शकलेला नाही.

सामाजिक-आर्थिक असमानता, पोषणाची कमतरता, शहरी झोपडपट्टय़ांतील राहणीमान आणि औषध-प्रतिरोधक टीबी (एमडीआर टीबी) ही सर्वात मोठी आव्हाने ठरत आहेत.