
सर्वोत्तम सांघिक कामगिरीच्या जोरावर यजमान मुंबई पोलीस जिमखाना संघावर एक डाव आणि 20 धावांनी विजय मिळवून न्यू हिंदू क्रिकेट क्लबने 78वी पोलीस ढाल क्रिकेट स्पर्धा जिंकली. पोलीस आयुक्तालय ग्रेटर मुंबई आणि पोलीस ढाल समितीच्या संयुक्त विद्यमाने मरीन लाईन्स येथील पोलीस जिमखाना मैदानावर झालेल्या अंतिम फेरीत 177 धावांनी पिछाडीवर पडलेल्या पोलीस जिमखाना संघाचा डाव दीपक शेट्टी व अथर्व अंकोलेकर (प्रत्येकी 4 विकेट) या मध्यम गती दुकलीच्या अचूक माऱ्यासमोर तिसऱ्या दिवशी रविवारी 25.5 षटकांत 157 धावांवर आटोपला. यजमानांच्या केवळ पाच फलंदाजांना दोन आकडी धावा करता आल्या.
त्यात, नवव्या क्रमांकावरील डावखुरा फलंदाज इरफान उमैरच्या सर्वाधिक 33 धावा आहेत. त्याच्यानंतर रूद्र धांडे (29 धावा) आणि तनुष मेहेरने ( 22 धावा) थोडा प्रतिकार केला. मुंबई पोलीस जिमखाना संघाने पहिल्या डावात 261 धावा केल्या. न्यू हिंदू क्रिकेट क्लबने 90 षटकांमध्ये 6 बाद 438 धावांचा डोंगर उभारताना पहिल्या डावात 177 धावांची आघाडी घेतली. तीच निर्णायक ठरली.
न्यू हिंदू सीसीला प्रमुख पाहुणे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, सचिव उन्मेष खानविलकर, सहसचिव नीलेश भोसले यांच्या हस्ते रोख एक लाख रुपये आणि विजेतेपदाची ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. उपविजेत्या मुंबई पोलीस संघाला उपविजेत्याची ट्रॉफी आणि 50 हजार रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.

























































