लालूंच्या कुटुंबात ‘यादवी’, चार कन्या गेल्या घर सोडून

बिहार विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर लालू प्रसाद यादव यांच्या कुटुंबात मोठा भूकंप झाला आहे. लालूंना किडनी देणारी कन्या रोहिणी आचार्य हिच्यानंतर लालू यांच्या आणखी चार मुलींनीही घर सोडले. रोहिणी यांनी आज पुन्हा ‘एक्स’वर दोन पोस्ट टाकून तीव्र संताप व्यक्त केला.

कोणाच्याही घरी रोहिणीसारखी बहीण-मुलगी जन्मायला नको, अशी संतप्त भावना व्यक्त केली. त्यानंतर सायंकाळी रागिणी, चंदा, हेमा आणि राजलक्ष्मी यांनी आज मुले व कुटुंबीयांसाह घर सोडले. त्या दिल्ली येथे गेल्या आहेत. शनिवारी रोहिणी यांच्या राजकारण आणि कुटुंबाचा त्याग करीत असल्याची पोस्टमुळे खळबळ उडाली होती. त्यांनी आज ‘एक्स’वर दोन पोस्ट टाकल्या. त्यात आणखी गंभीर आरोप केले.

भाऊ तेजप्रतापने दिला इशारा

तेजप्रताप यांनी इंस्टाग्रामवर टाकलेल्या पोस्टमध्ये ‘सून लो जयचंदो’ असे म्हणत इशारा दिला आहे. त्यांनी म्हटले की, वडिलांनी एक इशारा दिला तर बिहारचे लोक या जयचंदांना जमिनीत गाडतील. दरम्यान, तेजप्रताप यांनी बिहारमध्ये एनडीए सरकारला पाठिंबा जाहीर केला आहे. जन सुराज पक्षाचा ‘मत खरेदी’चा आरोप बिहार विधानसभा निवडणुकीच्या एकतर्फी निकालावर देशभरातून संशय व्यक्त होत असतानाच प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाने आज एनडीएवर ‘मत खरेदी’चा आरोप केला. जागतिक बँकेकडून विकासकामांसाठी मिळालेला 14 हजार कोटींचा निधी भाजप सरकारने बिहारमधील महिलांच्या खात्यात ट्रान्सफर केला. त्या बदल्यात महिलांची मते मिळवली, असा दावा जन सुराजने केला. मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेंतर्गत बिहारमधील एनडीए सरकारने महिलांच्या खात्यात 10 हजार रुपये जमा केले, असे प्रवत्ते पवन वर्मा म्हणाले.