बिबट्या येताच सायरन वाजणार, मोखाड्याच्या वारघडपाड्यात ‘एआय’ची नजर

बिबट्याच्या हल्ल्यापासून नागरिकांना स्वतःचा बचाव करता यावा यासाठी मोखाडा तालुक्यातील वारघडपाड्यात वनविभागाने ‘एआय कॅमेरा’ बसवला आहे. 100 मीटर अंतरावर बिबट्या दिसताच कॅमेऱ्याचा सायरन वाजणार असून त्यामुळे नागरिक सतर्क होणार आहेत. याआधी बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या एआय कॅमेऱ्यामुळे मोखाडावासीय काहीसे निर्धास्त झाले आहेत.

मोखाडा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून बिबट्या फिरत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि एकच धावपळ उडाली. गेल्या आठवड्यात बिबट्याने दुचाकीस्वारावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. तसेच दोन दिवसांपूर्वी खोडाळा-मोखाडा मार्गावरील देवबांध पुलावर बिबट्या नागरिकांना दिसला होता. या बिबट्याने आतापर्यंत अनेक बकऱ्या, वासरे आणि कुत्रे फस्त केले आहेत. या पाश्र्वभूमीवर वनविभागाने वारघडपाड्यात सौरऊर्जेवर चालणारा ‘एआय’ कॅमेरा लावला आहे. बिबट्या आल्याचे दिसताच हा कॅमेरा सायरन वाजवणार असून त्याचा आवाज सुमारे एक किलोमीटरपर्यंत पोहोचणार आहे.