कसाऱ्याच्या मोखवणेत आगडोंब, ढाबा जळून खाक; प्राणहानी नाही

मुंबई-नाशिक मार्गावरच्या मोखवणे फाट्यावरील ढाब्याला शनिवारी रात्री उशिरा भीषण आग लागली. या आगीत ढाबा जळून खाक झाला असून सुदैवाने कोणतीही प्राणहानी झालेली नाही. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने तब्बल तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.

रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ढाब्याच्या मागच्या बाजूला अचानक आग लागली. आजूबाजूला गवत असल्याने आगीचा भडका उडाला आणि आग पसरली. त्यामुळे सगळ्यांची पळापळ झाली. ढाब्यातील ग्राहक आणि कर्मचाऱ्यांनी वेळीच बाहेर पळ काढल्याने ते बचावले. यावेळी स्थानिक तरुणांनी धाव घेत ढाब्यातील विस्फोटक पदार्थ बाहेर काढले. या आगीची माहिती मिळताच कसारा पोलीस, आपत्ती व्यवस्थापन कक्ष व अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.

तर ज्वलनशील इंधनाचा टँकरही पेटला असता
दरम्यान ढाब्याच्या मागच्या बाजूला ज्वलनशील इंधन भरलेला टँकर उभा होता. आगीने टँकरलाही वेढले. यात टँकरच्या टायरने पेट घेतला. टँकरमधील ज्वलनशील इंधनाने पेट घेण्याआधीच पथकांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्याने अनर्थ टळला. ही आग वाढली असती तर ज्वलनशील इंधनाचा टँकर पेटून मोठी दुर्घटना घडली असती.