मातृभूमी सोडणे वेदनादायक, बांगलादेशची हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू, शेख हसीना यांची युनूस सरकारवर जोरदार टीका

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरुद्धच्या न्यायाधीकरणाचा (ट्रिब्युनल) निकाल सोमवारी सुनावण्यात येणार आहे. तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना शेख हसीना यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकारवर जोरदार टीका केली. बांगलादेशची हुकुमशाहीकडे वाटचाल सुरू असल्याचा आरोप हसीना यांनी केला. यावेळी त्यांनी मातृभूमी सोडणे खूप वेदनादायक असल्याचेही म्हटले.

ऑगस्ट 2024 मध्ये उसळलेल्या हिंसक आंदोलनानंतर शेख हसीना यांना बांगलादेश सोडावा लागला होता. हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी त्यांनी सुरक्षा दलाचा वापर केला. तसेच राजधानी ढाकामध्ये पोलिसांना हिंसक गर्दीवर गोळी चालवण्याचे आदेशही दिले होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात न्यायाधीकरणाचा (ट्रिब्युनल) खटला चालला गेला आणि याचा निकाल सोमवारी देण्यात येणार आहे. तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना हसीना यांनी त्यावेळी घडलेल्या घटनेचा उल्लेख केला आणि तो दिवस लोकशाहीसाठी विध्वंसक असल्याचे म्हटले.

विद्यार्थी आंदोलनाचा उपयोग लोककशी विरुद्ध शक्तींनी निवडून आलेले सरकार हटवण्यासाठी केले. तो लोकशाहीसाठी विध्वंसक दिवस होता, असे शेख हसीना म्हणाल्या. तसेच ऐतिहासिक निवासस्थानावर आंदोलनकर्त्यांनी घातलेला धुडगूस आणि तोडफोडीमुळे दु:ख झाल्याचेही त्यांनी म्हटले.

युनूस सरकार जाणूनबुजून निवडणुका लांबणीवर टाकत असल्याचा आरोपही शेख हसीना यांनी केला. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या निवडणुका असंवैधानिक सरकारला वैधता देण्याचे ढोंग करतील, असे म्हणत त्यांनी अवामी लीगवर घातलेल्या बंदीचाही निषेध केला. यामुळे लाखो नागरिकांच्या मतदानाचा हक्क हिरावून घेतला जाईल, असेही त्या म्हणाल्या.

हिंदू आणि इतर अल्पसंख्याक समुदायांना होणाऱ्या हल्ल्यांवरही हसीना यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. युनूस सरकारने दहशतवाद्यांशी संबंध असलेल्या गुन्हेगारांना मुक्त केले आणि त्यांच्या मंत्रिमंडळात दहशतवाद्यांना स्थान दिले. यामुळे धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांना धक्का बसल्याचा आरोपही हसीना यांनी केला.