
रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत महायुती फुटल्याची घटना घडली आहे. महायुतीतील घटक अजित पवार गटाने नगराध्यक्षपदासह काही नगरसेवकपदासाठी अर्ज भरल्याने महायुतीत बेबनाव दिसून आला आहे. महायुती तोडण्याचा आदेश हा अजित पवार गटाच्या प्रदेशस्तरावरून आला की स्थानिक मंडळीनीच ही भूमिका घेतली, यावर चर्चा होत आहे.
अजित पवार गटाकडून सोमवारी बशीर मुर्तुझा यांच्या पत्नी वाहिदा मुर्तुझा यांनी रत्नागिरी नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरला. त्याचबरोबर अजित पवार गटातून अन्य काही उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी अर्ज भरले. तत्पूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश चिटणीस बशीर मुर्तुझा यांनी अचानक पक्षांतर करत अजित पवार गटात प्रवेश करत पत्नीला निवडणूक रिंगणात उतरवल्याने महायुतीचं फुटली आहे. भाजपातील तीन उमेदवारांना शिंदे गटातून उमेदवारी देणाऱ्या पालकमंत्र्यांनी महायुतीतून फुटणारा अजित पवार गट का थांबवला नाही की पालकमंत्र्यांची राजकीय खेळी आहे का अशा चर्चा रंगत आहे. अजित पवार गट महायुतीतून फुटल्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात काय परिणाम होणार याबाबत चर्चांना ऊत आला आहे.अजित पवार गटाने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे महायुती फुटल्याचे स्पष्ट झाले आहे.

























































