
सध्याचे राजकारण बघता, शिंदे गट आणि भाजप एकमेकांची अडवत आहेत आणि एकमेकांची जिरवत आहे, असा जबरदस्त टोला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी लगावला. सध्या महायुतीतील बेबनाव उघड होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे. या सर्व शिंदे गट, अजित पवार गट आणि भाजपच्या नाट्यावर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देत शिंदे गटाला टोला लगावला आहे.
भाजपने फोडाफोडी केली की, शिंदे गट आणि अजित पवार गट फोडाफोडी करतात. त्यामुळे त्यांचे फोडाफोडीचे राजकारण सुरू आहे. त्यांनी याआधीच्या निवडणुकीत एकमेकांचे उमेदवारच घेतले आहेत. त्यावेळी त्यांना सर्व गोड वाटत होते. भाजपचे अनेक उमेदवार शिंदेकडे आहेत. नारायण राणे भाजपचे खासदार आहे आणि त्यांचा मुलगा शिंदे गटात आहे. भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांची मुलगी शिंदे गटात आहे, ते सर्व यांना चालते. हे सर्व शिंदेना चालते म्हणून आता जे शिंदेसोबत आहेत, त्यांनाही सोबत घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले.
शिंदेच्या गटातले सर्व प्रमुख नेते भाजपच्या संपर्कात आहेत. ते आता शिंदेना विचारतही नाहीत. अनेक मंत्रीही शिंदे यांना विचारत नाही. त्यातील अनेकजण भाजपच्या तालावर चालत आहेत. त्यामुळे शिंदेसोबत असलेल्यांना भाजपसोबत घेण्याचे प्रयत्न होत आहेत, असे दानवे यांनी सांगितले. शिंदे गटाचे 22 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. त्यामुळे शिंदे एकटे पडणार असल्याचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी सांगितले.































































