
सीएनजी तुटवडय़ामुळे मुंबईकर, ठाणेकरांची रस्ते प्रवासात कोंडी झाली. याचदरम्यान मंगळवारी सकाळी मध्य रेल्वे मार्गावर विक्रोळी आणि कांजूरमार्ग स्थानकांदरम्यान रुळाला तडा गेल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली. ऐन ‘पीकअवर्स’ला हा गोंधळ झाला आणि कार्यालय गाठण्याच्या वेळेतच रेल्वे प्रवाशांची रखडपट्टी झाली.
मध्य रेल्वेच्या विक्रोळी आणि कांजूर मार्ग स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 7 वाजून 32 मिनिटांनी रुळाला तडा गेल्याचे निदर्शनास आले. रेल्वेच्या कामगारांना रुळाला तडा दिसताच त्यांनी तातडीने वरिष्ठ प्रशासनाला कळवले. त्यानुसार संभाव्य अपघात टाळण्याच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेण्यात आली. सुरक्षेच्या कारणास्तव ठाण्याच्या दिशेने जाणाऱया डाऊन धिम्या मार्गावरील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली, तर या मार्गावरील काही लोकल माटुंगा स्थानकाहून डाऊन जलद मार्गावर वळवण्यात आल्या. ऐन ‘पीक अवर्स’ला लोकल सेवा तब्बल 25 ते 35 मिनिटे उशिराने धावल्याने प्रवाशांची लोकल प्रवासातच रखडपट्टी झाली. तडा गेल्याच्या भागात दुरुस्तीकाम केल्यानंतर त्या लाईनवरून हळूहळू लोकल चालवण्यात आल्या.
प्रवाशी सुरक्षेची खबरदारी घेत रेल्वे प्रशासनाने लोकल ट्रेनचा वेग ताशी 30 किमीपर्यंत मर्यादित केल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्प अधिकारी स्वप्नील निला यांनी दिली.
दिवसभर खचाखच गर्दी आणि रेटारेटी
रुळाला तडा गेल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने काही लोकल फेऱया रद्द केल्या. त्याचा इतर लोकल फेऱयांवर ताण आला. दिवसभरात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱया सर्वच लोकल गाडय़ांना प्रचंड गर्दी झाली. त्यात ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांचे हाल झाले.
ठाण्यातही लूट
सीएनजी बंदच्या नावाखाली रिक्षाचालकांकडून ठाणेकरांची लूट सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. रिक्षाचालकांच्या या मनमानी कारभारामुळे प्रवाशांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. नितीन कंपनी ते गावदेवीपर्यंत शेअर रिक्षाचे भाडे 15 रुपये असताना काही मुजोर रिक्षाचालकांकडून सर्रासपणे 25 रुपयांची मागणी केली जात आहे.
ठाणे शहरात 50 टक्क्यांहून अधिक रिक्षा गॅसअभावी बंद असल्याने उर्वरित रिक्षाचालकांनी संधीचा फायदा घेत प्रवाशांकडून जादा पैसे उकळण्याचा धंदा सुरू केला आहे. नितीन पंपनी ते गावदेवी शेअर रिक्षाचे भाडे 15 रुपये असताना प्रवाशांकडून प्रत्येकी 25 रुपये घेतले गेले, तर ज्ञानेश्वरनगर, कामगार हॉस्पिटल ते ठाणे स्टेशन 20 रुपये असताना गेल्या दोन दिवसांपासून अनेक प्रवाशांकडून 25 रुपये आकारण्यात आल्याची माहिती प्रवाशांनी दिली.
ठाणे स्थानक परिसरात प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. जादा पैसे आकारण्यात येत असल्याने काही ठिकाणी प्रवासी आणि रिक्षाचालकांमध्ये खटके उडत होते. मी दररोज नितीन कंपनी ते गावदेवी असा प्रवास करते. शेअर रिक्षा असल्याने 15 रुपये घेतले जातात. मात्र अचानक गॅस पुरवठा बंद असल्याचे कारण देत आज एका रिक्षाचालकाने सर्व प्रवाशांकडून प्रत्येकी 20 रुपये घेतले. रिक्षाचालकाला जाब विचारला असता त्यांनी नेहमीप्रमाणे उडवाउडवीची उत्तरे दिली. – सपना मोरे (प्रवासी)




























































