
>> प्रभाकर पवार
सोमवार, दि. १० नोव्हेंबर २०२५ रोजी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात मेट्रो स्टेशनच्या प्रवेशद्वारासमोर एका कारमध्ये महाभयंकर असा स्फोट झाला. त्यात चालकासह आजूबाजूचे १३ जण ठार झाले, तर २० जण गंभीर जखमी झाले. काही वेळात हा दहशतवादी हल्ला असल्याचे उघड झाले. कश्मीरमधील पुलवामा येथे राहणारा डॉ. उमर उन नबी हा आय २० ही कार चालवत होता. त्यात तोही ठार झाला. कारस्फोटाच्या तपासासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दहा अधिकाऱ्यांचे एक विशेष पथक स्थापन केले असून एनआयएने आतापर्यंत अर्धा डझनच्यावर डॉक्टरांचे एक ‘मॉड्यूल’ जेरबंद केले आहे. त्यात डॉ. शाहीन सईद या डॉक्टर महिलेचाही समावेश आहे.
डॉ. शाहीन ही लखनऊची असून ती फरिदाबादच्या अल फतह या विद्यापीठाशी संबंधित आहे. या विद्यापीठात प्राध्यापक असलेल्या या महिलेचे वागणे फारच संशयास्पद होते. दिल्लीच्या बॉम्बस्फोटात जी कार वापरली गेली. ती कार डॉ. शाहीनच्या कॉलेजजवळ दहा दिवस उभी होती. शाहीनला पकडण्यात आल्यानंतर तिच्या जवळ रायफल, पिस्तूल आदी शस्त्रसाठाही आढळून आला. दिल्लीतील बॉम्बस्फोटातील तीही एक सूत्रधार असल्याचे सांगण्यात येते. मुंबईवरील (२६/११) हल्ल्याचा मास्टर माइंड पाकिस्तानच्या हाफिज सईदची बहीण सादिया अझहर ही डॉ. शाहीनच्या संपर्कात होती. डॉ. शाहीन खियांच्या दहशतवादी संघटनेत सामील झाली होती. ती मुंबईसह देशभरात बॉम्बस्फोट घडविण्यासाठी उच्चशिक्षित डॉक्टरांना प्रेरित करीत होती, परंतु जम्मू-कश्मीरचे डॉ. जी. व्ही. के. सुंदर संदीप चक्रवर्ती हे तेलुगू आयपीएस अधिकारी कश्मीरमध्ये जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानी अतिरेकी संघटनेचे ६ डिसेंबरपूर्वी (बाबरीच्या पतनाचा दिवस) सूड घेण्यासाठी लागलेले पोस्टर पाहून सजग झाले. ज्यांनी पोस्टर लावले होते, त्यांना चक्रवर्ती यांनी अटक केली असता अतिरेकी डॉक्टरांचे एक ‘मॉड्यूल’ उघडकीस आले व एकाच वेळी बॉम्बस्फोट घडविण्याचा कट्टरपंथीय डॉक्टरांचा जो कट होता, तो उधळला गेला.
शाहीन ही घटस्फोटित महिला आहे. तिला दोन मुलेही आहेत, परंतु ते तिच्या पतीकडे राहतात. देशभरात बॉम्बस्फोट मालिकांची प्लॅनिंग करून मुंबईच्या टायगर मेमनप्रमाणे शाहीन दुबईला पळून जाणार होती, परंतु तिचा प्रयत्न आयपीएस अधिकारी चक्रवर्ती यांच्या सजगतेमुळे फसला गेला. तिच्या संपर्कातील डॉ. मुझ्झमिल गनी, डॉ. आदिल अहमद राथेर (याचे तर एक महिन्यापूर्वीच लग्न झाले होते), डॉ. अहमद मोहिद्दीन सय्यद (हा गुजरातचा डॉक्टर असून एरंडेल वनस्पतीच्या बियांपासून बनविण्यात येणाऱ्या अत्यंत विषारी अशा जीवघेण्या रिसिन’चा लाडूमध्ये वापर करून शेकडो हिंदू भाविकांचा प्राण घेण्याचा त्याचा कट होता), डॉ. सजाद मलिक (हाही अतिरेक्यांचे आश्रयस्थान पुलवामाचा रहिवासी आहे) या डॉक्टर अतिरेक्यांना अटक करण्यात आली आहे, तर पुलवामाचा सुसाईड बॉम्बर डॉक्टर उमर उन नबी बॉम्बस्फोटात पैगंबरवासी झाला आहे.
शाहीनला अटक झाल्यावर तिचा पती म्हणतो, “आम्ही उदारमतवादी (Liberal) आहोत. मूलगामी (Radicle) विचाराचे नाहीत. शाहीन मला दहा वर्षांपूर्वी घटस्फोट देऊन निघून गेली.” तिने का घटस्फोट दिला माहीत नाही,” असेही तो म्हणाला. याचा अर्थ शाहीनला दहशतवादी बनण्यासाठी तिचा किती ब्रेनवॉश केला गेला असेल याचा विचार करा. मुंबईच्या माटुंग्याच्या खालसा कॉलेजमध्ये शिकणारी मुंब्याची इसरत शेख गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची हत्या करण्यासाठी २०१४ साली मुंब्याहून गुजरातला पोहोचली होती. तिचाही बुद्धीभेद करण्यात आला होता, परंतु गुजरात पोलिसांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचण्याआधीच तिला व तिच्या साथीदारांना चकमकीत ठार मारले. २००३ साली मुंबईच्या अंधेरीच्या सय्यद मोहम्मद हनीफ अब्दुल रहीम व त्याची पत्नी फैमिदा या दांपत्याने दक्षिण मुंबईतील गेटवेजवळ कार बॉम्बस्फोट घडवून आणला. त्यात २३ नागरिक ठार झाले. या दांपत्याला न्यायालयाने मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली. हनीफ अलीकडे जेलमध्ये दीर्घ आजाराने मरण पावला, तर त्याची पत्नी फैमिदा जेलमध्ये शेवटची घटका मोजत आहे. सांगायचे तात्पर्य, जगभरातील इस्लामी अतिरेकी संघटना अतिरेकी कारवायांसाठी महिलांचा मोठ्या प्रमाणात वापर करून घेत आहेत. त्यांना आत्मघातकी पथकात सामील करून घेत आहेत. सद्यस्थितीत बोको हराम या नायजेरियातील इस्लामी दहशतवादी संघटनेत सर्वाधिक स्त्रिया आहेत. २०१५ साली पॅरिसमध्ये ‘शार्ली एब्दों या नियतकालिकाच्या कार्यालयात घुसून अल कायदाच्या अतिरेक्यांनी १४ पत्रकारांना ठार मारले होते. त्या वेळीही बौमुद्दिन या अतिरेकी तरुणीने हल्ल्यात भाग घेतला होता. तेव्हा अतिरेकी कारवायात भाग घेणारी डॉ. शाहीन ही पहिला महिला नव्हे!
पाकिस्तानातील बहावलपूर येथील जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेकी अनुचांवर भारतीय लष्कराने हल्ला करून ते उद्ध्वस्त केले. त्याचा सूड उगविण्यासाठी पाकिस्तानने भारतातील वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या, परंतु मानसिक आजारी (Mentally ill) असलेल्या अर्धा डझनच्या वर डॉक्टरांचा बॉम्बस्फोट घडविण्यासाठी वापर केला. यापूर्वीही मुंबईतील शीव (सायन) रुग्णालयात प्रॅक्टिस करणाऱ्या नागपाड्याच्या डॉ. जलीस अन्सारीने १९८९ ते १९९४ दरम्यान मुंबईसह देशभरात ५१ बॉम्बस्फोट घडवून आणले होते. ५ वर्षांनी १९९४ च्या जानेवारीत तो मुंबई क्राईम ब्रँचकडून पकडला गेला तेव्हा मुंबईतील बॉम्बस्फोट थांबले. संभाजीनगर येथील मोहम्मद अब्दुल मतीन डॉक्टरने तर मुलुंड रेल्वे बॉम्बस्फोटात १० जणांचा बळी घेतला होता. तेव्हा पाकिस्तानचे हे “प्रॉक्सी वॉर” आहे उच्चशिक्षित धर्मवेड्यांचे कधीही न संपणारे!




























































