
ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यातील १५ नगरपालिका आणि १ नगरपंचायत निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जाची आज छाननी झाली. २८०० हून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. यातील ४५० हून अधिक उमेदवारांच्या अर्जावर आक्षेप घेण्यात आले. यातील ५५ अर्ज अवैध ठरवण्यात आले. बहुतांश अर्जावर रात्री उशिरापर्यंत सुनावणी सुरू होती. छाननीतील वैध आणि अवैध अर्जाची अंतिम यादी उद्या बुधवारी जाहीर होणार आहे.
– उरणमध्ये नगरसेवकपदाचे सहा अर्ज अवैध, नगराध्यक्षपदाचे ९ पैकी २ अर्ज अवैध.
– वाड्यात नगराध्यक्षपदाचे ३ अर्ज अवैध, नगरसेवकपदाचे २६ अर्ज अवैध.
– खोपोलीत अजित पवार गटाचे सुनील पाटील आणि शिंदे गटाचे कुलदीपक शेंडे यांच्या अर्जावर आक्षेप.
– निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र ठाकूर यांनी माथेरान नगरपालिकेतील माजी नगरसेवक मनोज खेडकर आणि चंद्रकांत चौधरी यांचे अर्ज अवैध ठरविले. चौधरी यांचा नगराध्यक्षपदाचा अर्ज मात्र वैध ठरला.
वाड्यात अजित पवार गटाने दिला शिंदे गटाला धक्का
वाडा नगरपंचायतीच्या निवडणुकीपूर्वीच शिंदे गटाला धक्का बसला आहे. शिंदे गटाकडून नगरपंचायतीतील प्रभाग १२ मध्ये प्रसाद ठाकरे यांना उमेदवारी दिली होती. छाननीदरम्यान अजित पवार गटाचे उमेदवार प्रफुल्ल पाटील हे नगरपंचायतीचे ठेकेदार असल्याने त्यांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरविण्यात यावे असा आक्षेप घेतला. निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब अंधारे यांनी दोन्ही पक्षकारांची बाजू ऐकून घेतल्यानंतर शिंदे गटाचे उमेदवार प्रसाद ठाकरे यांचा अर्ज अवैध ठरवला.
पालघरमध्ये ३३ अर्ज बाद
पालघर नगर परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्जाच्या छाननीदरम्यान नगरसेवकपदाचे ३३ अर्ज बाद ठरले, तर शिंदे गटाचे रवींद्र म्हात्रे, सुभाष पाटील आणि भाजपचे मुनाफ मेमन या तिघांविरोधात वेगवेगळे आक्षेप नोंदवले आहेत. हे तीन अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निर्णयासाठी राखून ठेवले आहेत. नगरसेवकपदासाठी १३६ अर्ज वैध ठरले.





























































