
मुलींना फूस लावून वेश्याव्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या महिला दलालाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या महिलेच्या तावडीतून दोन पीडित मुलींची सुटका करण्यात अनैतिक वाहतूक प्रतिबंधक कक्षाला यश आले आहे. या महिलेविरोधात पथकाने बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत अटक केली आहे.
बदलापूर पश्चिम येथील एका हॉटेलमध्ये एक दलाल महिला काही असह्य मुलींकडून वेश्याव्यवसाय करून घेण्यासाठी आल्याची माहिती ठाणे शहर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गोरडे यांना मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने सापळा लावून महिलेला ताब्यात घेतले. या दलाल महिलेने आणखी किती मुलींना वेश्याव्यवसाय करण्यासाठी भाग पाडले आहे. तसेच या व्यवसायात तिचे अजून किती साथीदार आहेत याचा तपास पोलीस करत आहेत.




























































