
बलाढ्य हिंदुस्थानने दुसऱ्या महिला वर्ल्ड कप कबड्डी स्पर्धेत सलग दुसरा साखळी विजय मिळविताना यजमान बांगलादेशचा 43-19 असा पराभव करताना आपला उपांत्य फेरीतील प्रवेशही जवळजवळ निश्चित केला आहे. हिंदुस्थानसमोर इराण वगळता कुणाचाही निभाव लागणार नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले.
आज आक्रमक सुरुवात करीत हिंदुस्थानी महिलांनी 7व्या आणि 14 व्या मिनिटाला लोण देत 28-8 अशी जोरदार आघाडी घेतली. तिथेच हिंदुस्थानचा महाविजय निश्चित केला होता. मध्यंतराला हिंदुस्थानकडे 29-08 अशी आघाडी होती. मध्यंतरानंतर हिंदुस्थानने 17व्या मिनिटाला आणखी एक लोण देत आपली आघाडी 42-15 अशी भक्कम केली. आजच्या खेळाचे वैशिष्ट म्हणजे बांगलादेश संघाने पूर्वार्धात एक व उत्तरार्धात एक अशा दोन अव्वल पकडी केल्या. आज झालेल्या अन्य सामन्यांत इराणने झांझीबारचा 51-15, थायलंडने युगांडा 51-37, नेपाळने पोलंडचा 63-25 आणि तैपेईने नेपाळचा 31-15 असा सहज पराभव करत केला.





























































