
जीएसटी कस्टम्स, पुणे आणि वांद्रे वायएमसीए, मुंबई यांनी 29व्या राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत अनुक्रमे पुरुष आणि महिला गटाचे विजेतेपद पटकावले.
बॉम्बे वायएमसीए, घाटकोपर शाखा आयोजित महाराष्ट्र राज्य बास्केटबॉल संघटना (एमएसबीए) आणि ग्रेटर मुंबई नॉर्थ डिस्ट्रिक्ट बास्केटबॉल संघटना (जीएमएनडीबीए) यांच्या संयुक्त विद्यमाने घाटकोपर येथील वायएमसीए बास्केटबॉल कोर्ट येथे खेळवण्यात आलेल्या स्पर्धेत पुरुष गटाचा अंतिम सामना एकतर्फी झाला. त्यात तुल्यबळ जीएसटी कस्टम्सने सुरुवातीपासूनच वर्चस्व राखून नागपाडा बास्केटबॉल संघटनेवर (एनबीए) मध्यंतराला 38-32 अशी आघाडी घेत 76-58 असा सहज विजय मिळवला. जीएसटी कस्टम्ससाठी समीर कुरेशी (26 गुण) आणि अभिषेक अंभोरेचा (13 गुण) खेळ महत्त्वपूर्ण ठरला. एनबीए संघाकडून सलमान कुरेशी (15 गुण) आणि फैज शेखने (12 गुण) चांगला खेळ केला. महिला गटाच्या फायनलमध्ये, वांद्रे वायएमसीएने हूपर्स क्लबवर 44-37 अशी मात केली. त्यांनी मध्यंतराला 20-17 अशी आघाडी घेतली होती.
नेव्ही अर्ध मॅरेथॉनसाठी विशेष लोकल धावणार, मॅरेथॉनच्या स्पर्धकांना खूशखबर
पश्चिम नौदल कमांड नेव्ही अर्ध मॅरेथॉनमध्ये सहभागी होणाऱया स्पर्धकांना मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाने बुधवारी खूशखबर दिली. मॅरेथॉन स्पर्धकांच्या सोईसाठी शनिवारी मध्यरात्री उपनगरी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर प्रत्येकी एक विशेष लोकल ट्रेन चालवण्यात येणार आहेत. हिंदुस्थानी नौदल दिनाच्या निमित्ताने 23 नोव्हेंबरला नेव्ही अर्ध मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान विशेष लोकल धावेल. ही ट्रेन कल्याण येथून मध्यरात्री 2 वाजून 30 मिनिटांनी सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर पहाटे 4 वाजता पोहोचेल. तसेच हार्बर लाईनवर पनवेल येथून मध्यरात्री 2 वाजून 40 मिनिटांनी विशेष लोकल सुटेल. ती ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पहाटे 4 वाजता पोहोचणार आहे. दोन्ही मार्गावरील विशेष लोकल ट्रेन सर्व रेल्वे स्थानकांवर थांबणार आहेत. त्याचप्रमाणे पश्चिम रेल्वे मार्गावर विरार स्थानकातून मध्यरात्री 2 वाजून 30 मिनिटांनी विशेष लोकल चर्चगेटच्या दिशेने मार्गस्थ होईल. ही ट्रेन पहाटे 4 वाजून 12 मिनिटांनी चर्चगेट स्थानकात पोहोचणार आहे. या विशेष ट्रेनला पश्चिम रेल्वेच्या सर्व स्थानकांत थांबा असणार आहे. विशेष लोकल ट्रेनमुळे मुंबईच्या उपनगरांबरोबरच ठाणे आणि नवी मुंबई परिसरातील मॅरेथॉन स्पर्धकांना मोठा दिलासा मिळणार आहे.


























































