
दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ 10 नोव्हेंबरला झालेल्या कार स्फोटानंतर तपास यंत्रणांनी फरीदाबादच्या अल-फलाह विद्यापीठावर लक्ष केंदित केले आहे. विद्यापीठातील 200 पेक्षा जास्त डॉक्टर आणि कर्मचारी आता तपासाच्या कक्षेत आहेत. कॅम्पसमध्ये सतत सुरक्षा तपासणी सुरू असून विद्यार्थ्यांमध्ये आणि कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
बुधवारी अनेक कर्मचाऱ्यांना आपापली सामानं कारमध्ये भरून कॅम्पस सोडताना पाहिले गेले. विद्यापीठातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, कर्मचारी रजा घेऊन आपल्या घरी परतले आहेत. स्फोटानंतर कोण-कोण विद्यापीठ सोडून गेले आणि का याचा शोध तपासयंत्रणा घेत आहे.
अनेकांनी आपल्या मोबाईल फोनमधील डेटा डिलीट केला आहे. तपास यंत्रणा या बाजूचीही गंभीर चौकशी करत आहेत. आतापर्यंत 1,000 पेक्षा जास्त लोकांची चौकशी झाली आहे. पोलिस हॉस्टेल आणि कॅम्पसच्या बाहेर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खोल्यांचीही तपासणी केली जात आहे.
तपासात उघड झाले की नूंहमध्ये ज्या महिलेनं आत्मघाती हल्लेखोर डॉ. उमर उन नबीला खोली भाड्याने दिली होती, तिला अटक करण्यात आली आहे. तिचे कुटुंबही तपासाच्या कक्षेत आहे. सात इतर लोकांकडूनही उमरशी असलेल्या संबंधांबाबत चौकशी करण्यात आली आहे. उमरने नूंहमध्ये राहण्याच्या काळात अनेक मोबाईल फोन वापरले होते.
अल-फलाह मेडिकल कॉलेजचे नाव दहशतवादी संपर्काच्या प्रकरणात आल्यानंतर रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. पूर्वी रोज 200 रुग्ण ओपीडीमध्ये येत होते; आता ही संख्या 100 च्याही खाली आली आहे.
विद्यापीठातील डॉक्टरांनी सांगितले की उमर सहा महिने कोणतीही माहिती न देता गायब होता, पण परत आल्यानंतर त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. तो फार कमी वर्ग घेत असे आणि त्याला नेहमी संध्याकाळी किंवा रात्रीच्या शिफ्टमध्येच काम दिले जात असे. हे आता तपास यंत्रणांसाठी मोठे प्रश्न निर्माण करणारे ठरत आहे.
NIA, दिल्ली पोलिस स्पेशल सेल, यूपी ATS, फरीदाबाद क्राइम ब्रांच आणि जम्मू-कश्मीर पोलिस सतत विद्यापीठात तळ ठोकून आहेत. मंगळवारी ED ची टीमही पोहोचली. सर्व एजन्सींनी विद्यापीठात तात्पुरता कमांड सेंटर उभारला असून तपास अधिक वेगाने सुरू आहे.






























































