स्पायडर स्पोर्ट्स अॅकॅडमीचा मोठा विजय

एमसीसी टॅलेंट सर्च (14 वर्षांखालील) मुलांच्या क्रिकेट लीग स्पर्धेत स्पायडर स्पोर्ट्स अॅकॅडमीवर कॉम्रेड क्रिकेट क्लबचा 110 धावांनी पराभव केला. स्पर्श पाटीलची (नाबाद 38 धावा आणि 2 विकेट) अष्टपैलू कामगिरी त्यांच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरली.

ज्वाला स्पोर्ट्स फाऊंडेशन आयोजित ओव्हल मैदानावर खेळल्या जात असलेल्या स्पर्धेत बुधवारी कॉम्रेड क्रिकेट क्लबला स्पायडर स्पोर्ट्सचे 200 धावांचे आव्हान पेलवले नाही. त्यांचा डाव 25.2 षटकांत अवघ्या 89 धावांत संपला. समर्थ पिसेसह विहान वाडे आणि स्पर्श पाटीलने प्रत्येकी दोन विकेट घेत मोठा विजय सुकर केला.

तत्पूर्वी, कॉम्रेड क्रिकेट क्लबने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. स्पर्श पाटील (41 चेंडूत 38 धावा) विराट सिंग (54 चेंडूंत 37 धावा) आणि रोहितच्या (54 चेंडूंत 30 धावा) दमदार फलंदाजीच्या जोरावर स्पायडर स्पोर्ट्स अॅकॅडमीने 40 षटकांत 8 बाद 199 अशी मोठी धावसंख्या उभारली.