डोंबिवलीतील देवीचापाडा गावदेवी मंदिर मैदानाजवळ केडीएमसीने एका भूखंड गार्डनसाठी आरक्षित ठेवला आहे. मात्र या आरक्षित भूखंडावर जागामालक, बिल्डर आणि भूमाफियांनी पालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून आठ मजली बेकायदा टॉवर उभा केला आहे. पालिका आयुक्तांकडे याबाबतची तक्रार करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने अखेर एका नागरिकाने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
केडीएमसी आणि बिल्डरविरोधात हायकोर्टात याचिका दाखल झाल्याने भ्रष्ट अधिकारी आणि बिल्डरांचे धाबे दणाणले आहेत. डोंबिवली पश्चिमेकडे रेतीबंदर रोडला असलेल्या गावदेवी मंदिर ते सत्यवान चौक येथे बेकायदा आठ मजली इमारत उभी केली आहे. राहुलनगरमध्येही अशाच दोन इमारती उभ्या केल्या आहेत. बनावट कागदपत्रांच्या आधारे इमारतीमधील सदनिका भूमाफियांनी विकून खरेदीदारांची फसवणूक केल्याची तक्रार उमेशनगर येथील संदेश म्हात्रे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. ही इमारत केडीएमसीने यापूर्वीच अनधिकृत घोषित केली आहे. बगिचाच्या आरक्षणावरील ही इमारत जमीनदोस्त करावी, यासाठी आपण सातत्याने पत्रव्यवहार करत आहोत. मात्र पालि का दिशाभूल करणारी माहिती देत असल्याचा आरोप तक्रारदार संदेश म्हात्रे यांनी केला आहे.




























































