
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर डॉक्टरांचे दहशतवादी मॉडय़ूल उघडकीस आले होते. डॉक्टर आणि अभियंते दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी होते, हा एक ट्रेंड बनला आहे. हे लोक सरकारी पैशांचा वापर करून शिक्षण घेतात अन् देशविरोधी कारवायांमध्ये सहभागी होतात. ‘सीएए’ कायद्याविरोधातील निदर्शने ही देशात सत्ताबदल घडवून आणण्यासाठी करण्यात होती, असा दावा दिल्ली पोलिसांनी आज सर्वोच्च न्यायालयात केला.
दिल्लीत 2020 मध्ये झालेल्या ‘सीएए’विरोधात झालेल्या निदर्शनानंतर उफाळून आलेल्या दंगलीशी संबंधित आरोपी उमर खालिद, शरजिल इमाम व इतरांच्या जामीन अर्जाला दिल्ली पोलिसांनी कडाडून विरोध केला. न्या. अरविंद पुमार आणि न्या. एन. व्ही. सुनावणीदरम्यान दिल्ली पोलिसांच्या वतीने युक्तिवाद करताना अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी सांगितले की, हा सध्या निषेध नाही. हे हिंसक आंदोलन आहे. ते ब्लॉकेडबद्दल बोलत आहेत. सीएएविरोधी निदर्शने ही केवळ दिशाभूल करण्यासाठी होती. त्यामागील मूळ हेतू हा देशात अस्थिरता माजवून सत्तांतर घडविणे हा होता. असे बुद्धिवादी लोक जेव्हा दहशतवादी बनतात तेव्हा ते जमिनी स्तरावर असलेल्या दहशतवाद्यांपेक्षा जास्त धोकादायक ठरतात, असे अॅड. राजू म्हणाले.
ट्रम्प भेटीची वेळ पाहूनच आखला कट
दिल्ली पोलिसांनी सांगितले की, शरजिल इमाम हा अभियंता आहे. त्याने निदर्शनादरम्यान दिलेल्या भाषणांमुळे हिंसाचार झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीची वेळ पाहूनच दंगलींची योजना आखण्यात आली, जेणेकरून जगाचे लक्ष वेधले जाईल. आरोपींना देशभरात दंगली घडवून आणायच्या होत्या, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला.
देशाच्या सार्वभौमत्वावर केलेला हल्ला
अॅड. राजू यांनी न्यायालयात काही व्हिडीओ दाखविले. त्यात शरजिल इमाम हा ‘सीएए’ कायद्याविरोधात भडकाऊ भाषण करताना दिसतो. खालिद, इमाम, गुलफिशा फातिमा आणि रहमान यांच्याविरुद्ध दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. त्यांच्या जामीन अर्जाला विरोध करताना अॅड. राजू म्हणाले की, आंदोलन हे उत्स्फूर्त नव्हते. तो देशाच्या सार्वभौमत्वावर अतिशय नियोजनबद्ध केलेला हल्ला होता.




























































