
शासकीय तंत्रशिक्षण मुंबई महाविद्यालयाअंतर्गत शिकणाऱया विद्यार्थ्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे. या पार्श्वभूमीवर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार आज युवासेना सिनेट सदस्यांनी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळचे संचालक डॉ. प्रमोद नाईक यांची भेट घेऊन निवेदन दिले.
तंत्रशिक्षण शाखेच्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रातील गंभीर त्रुटी, विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रासंदर्भात झालेल्या चुकीच्या व विस्कळीत प्रक्रियेबाबत विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे याला जबाबदार असणाऱयांवर तातडीने कार्यवाई करावी आणि ही समस्या कायमची दूर करण्यासाठी सक्षम प्रणाली विकसित करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. अनेक महाविद्यालयांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांना आवश्यक शिक्षण मिळत नाही. वसतिगृहाचे बांधकाम रखडल्याने विद्यार्थ्यांच्या निवासाचा प्रश्न गंभीर झाला आहे. याशिवाय तंत्रनिकेतनच्या मैदानांची स्वच्छता, दुरुस्ती व नियमित देखभाल करावी, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या. यावेळी शिवसेना उपनेत्या सिनेट सदस्य शीतल शेठ-देवरुखकर, सिनेट सदस्य प्रदीप सावंत, शशिकांत झोरे, माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर, कॉलेज कक्ष पदाधिकारी ऋषी साळवे उपस्थित होते.
सर्व समस्या सोडवणार
– युवासेनेने केलेल्या मागण्यांबाबत आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन या बैठकीवेळी संचालकांनी दिले. दरम्यान, युवासेना सचिव आमदार वरुण सरदेसाई पुढील आठवडय़ात संबंधित प्रश्नांबाबत प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. याबाबत संचालक डॉ. विनोद मोहितकर यांना निवेदनही देण्यात आले आहे.




























































