
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चोख उत्तर दिले. चार दिवस चाललेले हे ऑपरेशन आणि यादरम्यान झालेले नुकसान याबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगू लागल्या आहेत. अमेरिकन काँग्रेसच्या नवीन द्विपक्षीय अहवालात हा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून अनेक गंभीर दावे केले आहेत.
ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानची पाच तर हिंदुस्थानची तीन लष्करी विमाने पाडण्यात आली. ऑपरेशन सिंदूरदरम्यान एकूण 8 लष्करी विमाने पाडल्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा खरा असला तरी ही सर्व विमाने राफेल नसल्याचे अमेरिकन काँग्रेसच्या नवीन द्विपक्षीय अहवालातून समोर आलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी वारंवार केलेल्या दाव्यानुसार, मे महिन्याच्या सुरुवातीला ऑपरेशन सिंदूरदरम्यान झालेल्या चकमकीत एकूण आठ विमाने पाडण्यात आली. मात्र अमेरिकेच्या अहवालानुसार हे स्पष्ट होत आहे की एकट्या पाकिस्तानने पाच लष्करी विमाने गमावली असून त्यांचा विजयाचा दावा खोटा ठरला असून हिंदुस्थानचा दावा सिद्ध होतो.
अमेरिकेच्या अहवालात असेही म्हटले आहे की या संघर्षानंतर चीनने भारताच्या राफेल विमानांबद्दल चुकीची माहिती पसरवली. चीन आपली जे-10 लढाऊ विमाने आणि पीएल-15 क्षेपणास्त्रे विकण्यासाठी असे करत होता, ज्यांचा वापर हिंदुस्थानी विमानांना लक्ष्य करण्यासाठी केला जात होता, असा आरोप आहे.
अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार, पाकिस्तानच्या जे-10 विमानांनी एका राफेलसह दोन भारतीय विमाने पाडली. मात्र नवीन अहवालात नमूद करण्यात आले आहे की हिंदुस्थानने तीन जेट विमाने गमावली, परंतु ही सर्व राफेल नव्हती.



























































