खर्डी, भातसानगरमधील भात खरेदी केंद्र बंद शेतकऱ्यांची 20 किलोमीटरची फरफट

शेतकऱ्यांच्या तांदळाला हमीभाव मिळावा यासाठी आदिवासी विकास मंडळातर्फे सावरोली, डोळखांब, मुगाव, आटगाव व पिवळी या पाच ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी प्रक्रियादेखील सुरू झाली असली तरी खर्डी व भातसानगरमधील भात खरेदी केंद्र यंदा सुरू होणार नाहीत. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांची फरफट होणार असून त्यांना आपला भात विकण्यासाठी 20 किलोमीटर दूरवर असलेल्या आटगाव केंद्रावर जावे लागणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा पैसा आणि वेळ वाया जाणार आहे. दरम्यान खर्डी व भातसानगरमधील खरेदी केंद्र पुन्हा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

सावरोली, डोळखांब, मुगाव, आटगाव व पिवळी या पाच ठिकाणी भात खरेदी केंद्र सुरू करण्याची मंजुरी शहापूरच्या उपप्रादेशिक उपव्यवस्थापक तुषार वाघ यांनी दिली आहे. या केंद्रावर 2 हजार 389 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी केला जाणार आहे. मात्र यंदाच्या वर्षी खर्डी व भातसानगर येथील खरेदी केंद्र बंद असल्याने तेथील ग्रामस्थांना आटगाव येथील केंद्र गाठावे लागणार आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना भात विक्री करण्यासाठी मोठी कसरत करावी लागेल. ऑनलाईन प्रक्रिया केल्यानंतर भाड्याने टेम्पो करून हा माल 20 किलोमीटर लांब असलेल्या आटगाव केंद्रावर घेऊन जाणे ग्रामस्थांना परवडत नसल्याने अनेक शेतकरी हा भात खासगी व्यापाऱ्यांना कवडीमोल भावात विकत आहेत. त्यामुळे खर्डी येथेही केंद्र मंजूर करून तत्काळ खरेदी सुरू करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अल्पसंख्यांक विभागाचे तालुकाध्यक्ष शाकीर शेख यांनी केली आहे.

शहापूर – मुरबाड तालुक्यात 8 केंद्रे मंजूर करण्यात आली असून लवकरच ही केंद्रे सुरू करण्यात येतील. त्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य कागदपत्रांसह ऑनलाईन नोंदणी करावी.
तुषार वाघ, उपव्यवस्थापक, आदिवासी विकास महामंडळ.