हिंदी-मराठीच्या वादातून कल्याणच्या विद्यार्थ्याने उचलले टोकाचे पाऊल, टोळक्याने केलेल्या मारहाणीमुळे नैराश्य

हिंदी-मराठीच्या वादातून एका 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा बळी घेतल्याची घटना कल्याणमधील तिसगाव नाका परिसरात घडली. मुलुंड येथील एका कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत शिक्षण घेणारा अर्णव खैरे हा नेहमीप्रमाणे लोकलने प्रवास करीत होता. त्यावेळी लोकल मध्ये असलेल्या प्रवाशाला तो हिंदीत पुढे होण्यासाठी बोलला. त्याचवेळी त्या ठिकाणी असलेल्या पाच जणांच्या टोळक्याने तुला मराठी बोलता येत नाही का? मराठी बोलण्याची लाज वाटते? असे बोलून त्याला जबर मारहाण केली. या मारहाणीमुळे निराश झालेल्या अर्णवने घरी आल्यानंतर पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

कॉलेजमध्ये जाण्यासाठी अर्णव मंगळवारी नेहमीप्रमाणे कल्याणहून लोकलने निघाला होता. ट्रेनमध्ये गर्दी असल्याने अर्णव याने हिंदीत ‘थोडा आगे हो’ असे बोलला. इतक्यात आजूबाजूच्या चार ते पाच जणांच्या टोळक्यांनी तुला मराठी बोलता येत नाही का? अशी विचारणा करत तुला मराठी बोलण्याची लाज वाटते? असे म्हणत त्याला ठोशा-बुक्क्यांनी मारहाण केली. घाबरलेला अर्णव ठाणे स्टेशनवर उतरला आणि मागील लोकलने कॉलेजला गेला. मानसिक तणावात गेल्याने अर्णव कॉलेज अर्धवट सोडून दुपारी घरी परतला. याच दरम्यान अर्णवने वडिलांना फोन करून आपल्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. सायंकाळी वडील घरी आले असता घराचा दरवाजा आतून बंद होता. शेजाऱ्यांच्या मदतीने दार उघडल्यानंतर बेडरूममध्ये अर्णवने ओढणीने गळफास घेतल्याचे आढळले.

अर्णवच्या वडिलांनी तत्काळ रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर अर्णवच्या वडिलांनी कल्याण कोळसेवाडी पोलीस ठाणे गाठत तक्रार केली. याप्रकरणी पोलिसांनी वडिलांच्या जबाबानुसार तपास सुरू केला आहे.